मानव-वन्यजीवसंघर्ष शिगेला..नागभीडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाघाच्या हल्ल्यात महिला ठार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मानव-वन्यजीवसंघर्ष शिगेला..नागभीडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

मानव-वन्यजीवसंघर्ष शिगेला..नागभीडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

Published Nov 29, 2022 12:17 AM IST

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी एक महिला व्याघ्र बळी ठरली. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण असून वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार
वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात आणखी एका महिलेला जीव गमवावा लागला आहे. दोन दिवसातील ही दुसरी घटना आहे. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.  सावरगाव येथील शेतात धान कापणी करीत असताना वाघाने हल्ला करून शेतमजूर महिलेस गंभीर जखमी केले. जखमी महिलेचा उपचारादरम्यान  मृत्यू झाला.  ही घटना  सोमवारी  दुपारी  घडली.  संगीतासंजय खंडरे (४५), असे मृत महिलेचे नाव आहे.

नागभीड तालुक्यातच पाहार्णी येथे शनिवारी रात्री वाघाने केलेल्या हल्ल्यात आणखी एका  महिलेला  प्राण गमवावे लागले होते. वनिता वासुदेव कुंभरे (५७), असे मृत महिलेचे नाव होते. या घटनेमुळे  परिसरात रोष  व्यक्त होत आहे. वनविभागाने  वाघाचा तातडीने  बंदोबस्त करावा,  अशी नागरिकांची मागणी आहे.

सावरगाव येथील संगीता खंडरे  या दुसऱ्याच्या शेतात धान कापणीच्या  कामावर गेल्या होत्या.  धान कापणी करीत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला चढवला. वाघाने त्यांना ५० फुटापर्यंत फरफटत नेले. तेथे उपस्थित महिलांनी आरडाओरड  केल्याने  वाघाने  महिलेला  सोडून पळ काढला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर