Akshay Shinde News: बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी आणि पोलीस चकमकीत ठार झालेला मृत अक्षय शिंदेयाच्या कुटुंबीयांनी पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अक्षय शिंदेंच्या मृत्युनंतरही त्याच्या अंत्यविधीसाठी जागा शोधण्यात अडचणी येत असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
अक्षयचे वडील अण्णा शिंदे यांनी अंबरनाथ येथे दफनभूमी निश्चित केली होती, अशी माहिती कातरनवरे यांनी न्यायालयाला दिली. मात्र, अण्णा घटनास्थळी गेले असता प्रभारी अधिकाऱ्याने त्यांना परवानगी नाकारली. त्यांना दिवसभर भटकंती करण्यास भाग पाडण्यात आले, असे कटारनवरे यांनी न्यायालयाला सांगितले. त्याला उत्तर देताना न्यायालयाने सरकारी वकिलांना या भागात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे निर्देश दिले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अक्षय शिंदेच्या घराबाहेर दोन पोलिस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. न्यायालयाने ही याचिका मान्य केली असून शिंदेच्या दफनविधीच्या परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.
अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्काराला बदलापूरकरांनी विरोध केल्यानंतर त्याचा मृतदेहाला अग्नी न देता पुरण्यचा निर्णय घेण्यात आला. परंतु, कोणत्याही परिस्थितीत आरोपी अक्षय शिंदेचे मांजर्ली स्मशानभुमीत अंत्यसंस्कार होऊ देणार नाही,असा आक्रमक पवित्रा स्थानिक नागरिकांनी घेतला. त्यनंतर कळवा, ठाणे येथील स्मशानभूमीत अक्षयचा मृतदेह दफन करण्यास अनेक संघटनांनी विरोध दर्शवला. मात्र, अंत्यसंस्काराला कोणीही विरोध करु शकत नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे. त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस विशेष खबरदारी घेत आहेत.
ठाणे गुन्हे शाखेचे अधिकारी तळोजा मध्यवर्ती कारागृहातून शिंदेला चौकशीसाठी पोलिसांच्या वाहनातून घेऊन जात होते. दरम्यान, मुंब्रा बायपासजवळ अक्षयने एका पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाला, अशी माहिती ठाणे पोलिसांनी दिली. ही घटना सोमवारी संध्याकाळी घडली. ठाणे पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारच्या चकमकीचा तपास महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभाग करणार आहे.