Shiv Sena UBT: शिवसेना यूबीटी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नतमस्तक केल्याचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोवर ठाकरे गटाकडून स्पष्टीकरण देण्यात आले. हा फोटो बनावट असून त्यात फेरफार करण्यात आल्याचा त्यांनी दावा केला आहे. तसेच याप्रकरणी संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे पक्षाने संकेत दिले आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये उद्धव ठाकरे हे राहुल गांधी यांना वाकून नमस्कार करत असल्याचे दिसत आहे. उत्कल ठाकोर नावाच्या युजरने फेसबुकवर हा फोटो शेअर केला आहे. तसेच, खुर्चीचा लोभ माणसाला अनेक गोष्टी करायला भाग पाडते, अजून किती झुकणार?', असे या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
याबाबत अधिक तपासणी केली असता हा फोटो बनावट असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी ८ ऑगस्ट २०२४ रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी केजरीवाल यांच्या आई-वडिलांना वाकून नमस्कार केला, ज्याचा फोटो शिवसेना यूबीटी पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला. याच फोटोमध्ये फेरफार करण्यात आला. उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांचा फोटो बनावट असल्याचा स्पष्ट झाले.
उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांचा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो बनावट आहे. उद्धव ठाकरे हे राहुल गांधी यांना नाहीतर अरविंद केजरीवाल यांच्या आई-वडिलांना वाकून नमस्कार करत होते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अशा पोस्टपासून सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात फोटोत फेरफार करून तो व्हायरल करण्यामागे भाजपचा हात असल्याचा शिवसेना यूबीटी पक्षाने आरोप केला आहे. शिवसेना यूबीटी पक्षाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या फोटोवर प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे की, खोटे बोलणे आणि गैरवर्तन करणे, हे भाजपच्या डीएनएमध्ये आहे, हे आम्हाला माहिती आहे. याप्रकरणी आम्ही पोलिसांत तक्रार दाखल करू.
उद्धव ठाकरेंबाबत अशाप्रकारच्या अफवा सोशल मीडियावर पसवल्या गेल्या आहेत. याआधी लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांनी एका मुलाखतीदरम्यान उद्धव ठाकरेंना बाहेर जाण्यास सांगितले असा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. मात्र, तसे काही नव्हते. शरद पवारांनी उद्धव यांच्याशी बोलण्याआधी काही काळ थांबावे अशी विनंती केली होती. मात्र, हा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने लोकांपर्यत पोहोचवण्यात आला होता.