Pune fraud Army recruitment : पुण्यात लष्करभरतीचे रॅकेट उघडकीस आली आहे. लष्करात नोकरी देण्याच्या बहाण्याने काही तरुणांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी मिलिटरी इंटेलिजन्स आणि कोंढवा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून मोठ्या टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. आरोपीने कमांड हॉस्पिटल आणि लष्करात विविध पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली असून या प्रकरणी सेवानिवृत्त अकॉउंटला अटक करण्यात आली आहे.
विनायक तुकाराम कडाळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कडाळेने कमांड हॉस्पिटल येथून अकॉउंट (सिव्हिल सर्व्हिस) मधून स्वेइच्छा सेवानिवृत्ती घेतली आहे. कडाळे याने कमांड हॉस्पिटल आणि लष्करात विविध पदावरून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फिर्यादी तरुण व त्याच्या काही मित्रांकडून तब्बल १३ लाख ५० हजार घेत फसवणूक केली. या प्रकरणाची माहिती ही लष्कराच्या गुप्तचर विभागाला मिळाली. त्यानुसार कोंढवा पोलिसांच्या मदतीने लष्कराच्या गुप्तचर विभागाने ही कारवाई करत आरोपी कडाळला अटक केली आहे.
गुन्हा केल्यानंतर कडाळे हा नेहमी राहण्याचा पत्ता बदलून दुसऱ्या ठिकाणी राहायला जात होता. कडाळे हा लुल्लानगर येथील सपना पावभाजी जवळील सोसायटीत राहत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोलीस अंमलदार विकास मरगळे, रोहित पाटील आणि सर्दन कमांड मिलेटरी इंटेलिजन्स यांना मिळाली होती. कडाळे हा वेषांतर करून फिरत असल्याचे तपासात समोर आले होते. कोंढवा पोलीस आणि मिलेटरी इंटेलिजन्सची संयुक्त कारवाई करत विनायक कडाळे याला अटक केली आहे. कडाळे याने अजून काही बेरोजगार तरुणांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बाबर करत आहेत.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनप्रमाणे सहाय्य्क पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, दिनेश पाटील, पोलिस अंमलदार अमोल हिरवे, राहुल वंजारी, अभिजीत रत्नपारखी, जयदेव भोसले, विकास मरगळे, राहुल थोरात, सुहास मोरे, अभिजीत जाधव, आशिष गरुड, रोहित पाटील, अक्षय शेंडगे, शशांक खाडे यांच्या पथकाने केली.