Devendra Fadnavis Reply to Sharad Pawar : ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी बारामतीतील घरी दिलेलं जेवणाचं आमंत्रण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाकारलं आहे. पवारांच्या आमंत्रणाला नकार देण्यामागचं कारणही फडणवीसांनी सांगितलं आहे. व्यग्रतेमुळं यावेळी तरी शक्य होणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
शरद पवारांचा गृहतालुका असलेल्या बारामतीमधील (Baramati) विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या परिसरात राज्य सरकारच्या वतीनं नमो महारोजगार मेळाव्याचं (Namo Maharojgar Melava) आयोजन करण्यात आलं आहे. उद्या, २ मार्च रोजी हा महामेळावा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री फडणवीस हे देखील या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाच्या निमित्तानं बारामतीमध्ये येणाऱ्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना शरद पवारांनी जेवणाचं आमंत्रण दिलं होतं. पवारांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना स्वत: फोन करून तशी विनंती केली होती. अतिथी देवो भव: या भूमिकेतून आमंत्रण दिल्याचं खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी म्हटलं होतं. हे आमंत्रण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री स्वीकारतात का याविषयी उत्सुकता होती.
शरद पवारांच्या आमंत्रणाच्या पत्राला फडणवीसांनी पत्राद्वारे उत्तर दिलं आहे. भोजनासाठी दिलेल्या आमंत्रणाबद्दल त्यांनी सुरुवातीलाच पवारांचे आभार मानले आहेत. पुढं ते म्हणतात, ‘आपण जाणताच की, अजितदादा पवार यांच्या पुढाकारातून बारामती इथं नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन केलं आहे. बारामतीतील भरगच्च कार्यक्रम लक्षात घेता आणि त्यानंतर वढू बुद्रुक आणि तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकांचे भूमिपूजन, त्यानंतर लगेचच आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचं भूमिपूजन असे आणखी दोन मोठे कार्यक्रम लागोपाठ असल्यानं उद्याचा संपूर्ण दिवस अत्यंत व्यग्रतेचा असणार आहे. त्यामुळं आपल्या आग्रही निमंत्रणाला मान देणे यावेळी तरी शक्य होणार नाही.’
शरद पवारांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या आमंत्रणाची राजकीय वर्तुळात चर्चा होती. यामागे पवारांचा नक्कीच काहीतरी हेतू असावा, असं बोललं जात होतं. सध्या राज्यात आणि खुद्द बारामतीमध्येही शरद पवार विरुद्ध अजित पवार असा राजकीय संघर्ष सुरू आहे. बारामतीमध्ये अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार व सुप्रिया सुळे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे. फडणवीस व शिंदे हे या संघर्षात अजित पवारांच्या बाजूनं आहेत. असं असताना त्यांना आमंत्रण देऊन अजित पवारांची कोंडी करण्याचा पवारांचा डाव असल्याची चर्चा होती. हा एक प्रकारचा गुगली असल्याचंही बोललं जात होतं. मात्र, शिंदे व फडणवीसांनी हा गुगली चुकवला आहे. मुख्यमंत्र्यांनीही हे आमंत्रण नाकारल्याची चर्चा आहे.
संबंधित बातम्या