Maharashtra Reservation: मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी येत्या १५ तारखेला विशेष अधिवेशन बोलावावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली आहे. या मागणीसाठी जरांगे पाटील पुन्हा एकदा आंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला बसले आहेत. याच पार्श्वभूमीवर मराठा समाजाकडून १४ फेब्रुवारी २०२४ ला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली, अशी माहिती सोशल मीडियाद्वारे पसरवली जात आहे.
मुंबईतल्या जरांगे पाटलांच्या आंदोलनात राज्य सरकराने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या. परंतु, परिपत्रकाची अद्याप अंमलबजावणी झाली नसल्याने जरांगे पाटील पुन्हा आमरण उपोषणाला बसले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काढलेल्या परिपत्रकाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी मराठा समाजाच्या वतीने येत्या १४ फेब्रुवारीला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे, असे मॅसेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मात्र, हे मॅसेज मराठा समाजाच्यावतीने व्हायरल केले जात आहे. मनोज जरांगे पाटील यांनी याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही.
मनोज जरांगे पाटील यांनी १० फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. जरांगे यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस असून त्यांची तब्येत खालावली. जरांगे यांच्या उपोषणस्थळी डॉक्टर आले असता, जरांगे पाटील यांनी डॉक्टरांना तपासणी करू दिली नाही.मनोज जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला.पोटात अन्नाचा कण नसल्याने जरांगे यांची तब्येत खालावत असल्याचे डॉक्टर म्हणाले.