mukt vidyapith admission : मुक्त विद्यापीठात प्रवेश घेण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. १५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने इच्छुकांना प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. यापूर्वी या प्रवेशासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत होती. ही मुदत संपली असून शिक्षण घेणाऱ्या मुलांचे नुकसान होऊ नये या साठी विद्यापीठ प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
अनेकांना कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण घेणं शक्य नसतं. तर काही जण काम करून शिक्षण घेत असतात. त्यामुळे त्यांना शिक्षण घेण्यासाठी मुक्तविद्यापीठ हा पर्याय असतो. दरवर्षी मुक्त विद्यापीठांच्या विविध अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या ही मोठी असते. या वर्षी देखील राज्यभरातील मुलांनी विविध अभ्यास क्रमासाठी मुक्त विद्यापीठात ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर केले होते. अर्ज दाखल करण्याची तारीख ही ३१ ऑगस्ट होती. त्यापूर्वी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै होती. आता पुन्हा दुसऱ्यांना अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे.
मुक्त विद्यापीठाने विविध अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया १ जूनपासून सुरू करण्यात आली आहे. यानंतर ही मुदत दोन वेळा वाढवण्यात आली आहे. सुरवातीला ३१ जुलैपर्यंत प्रवेश घेण्याची मुदत होती. यानंतर ही मुदत ३१ ऑगस्ट करण्यात आली. ही मुदत संपली. मात्र, विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी पुन्हा मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. आता पर्यंत ३ लाख विद्यार्थ्यांनी मुक्तविद्यापीठाच्या विविध अभ्यास क्रमासाठी प्रवेश घेतला आहे.
विद्यार्थी आणि पालकांची मागणी विद्यापीठ प्रशासनाने मान्य केली आहे. आता ही मुदत पुन्हा १५ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे मुलांना ऑनलाइन प्रवेश घेता येणार आहे. याचे परिपत्रक विद्यापीठाच्या संकेत स्थळावर अपलोड करण्यात आले आहे. अभ्यास क्रमात प्रवेश घेण्यासाठी विद्याथ्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहिती पुस्तिकेचा आधार घ्यावा व त्याआधारे निर्धारित मुदतीत प्रवेश अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अर्ज भरतांना काही तांत्रिक अडचणी आल्यास संकेतस्थळावर असलेल्या साह्यता संपर्क क्रमांकवर संपर्क करावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे.