Anil Deshmukh News: माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. नरखेड गावातील सभेला उपस्थित राहून देशमुख काटोलयेथे परतत असताना रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचाराचाकरिता काटोलच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे.
अनिल देशमुख हे नरखेड येथील सांगता सभा आटपून काटोल येथे तीनखेडा भिष्णुर मार्गाने परत येत असताना काटोल जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ काही व्यक्तीने त्यांच्या गाडीवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या देशमुख यांना तातडीने काटोल सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी या घटनेला दुजोरा दिला. या घटनेनंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अनिल देशमुख यांच्यावर हल्ला करणाऱ्यांची ओळखली पटवली जात आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ही घटना घडली आहे. देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख हे काटोल विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या (शरद पवार) तिकिटावर भाजपचे चरणसिंह ठाकूर यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत.
या घटनेवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी ट्विटरच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली.'राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या मी तीव्र निषेध करतो. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यात एका माजी गृहमंत्र्यांवर प्राणघातक हल्ला होतो यावरून राज्यात कायद्याचे राज्य आहे की गुंडांचे असा प्रश्न पडतो? राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली असून निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका होण्यासाठी निवडणूक आयोगाने तात्काळ हस्तक्षेप करून कायदा सुव्यवस्था सुरळीत राहील यासाठी पाऊले उचलली पाहिजेत', असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.