मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Uddhav Thackeray: ठाकरेंनी साधला नेम, ‘या’ मतदारसंघात होणार संजय विरुद्ध संजय ‘गेम’

Uddhav Thackeray: ठाकरेंनी साधला नेम, ‘या’ मतदारसंघात होणार संजय विरुद्ध संजय ‘गेम’

Haaris Rahim Shaikh HT Marathi
Oct 20, 2022 04:23 PM IST

Sanjay Deshmukh joins Shiv Sena: उद्धव ठाकरे यांनी आज एक मोठी खेळी खेळत अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री संजय राठोड यांच्याविरुद्ध व्यूहरचना केली आहे.

Ex MLA Sanjay Deshmukh joined Shivsena (Uddhav Balasaheb Thackeray) faction
Ex MLA Sanjay Deshmukh joined Shivsena (Uddhav Balasaheb Thackeray) faction

Former Minister Sanjay Deshmukh joins Shiv Sena: राज्यात प्रचंड तापलेल्या राजकीय पटलावर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे गट एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. अशातच उद्धव ठाकरे यांनी आज एक मोठी खेळी खेळत यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते, अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री संजय राठोड यांच्याविरुद्ध व्युहरचना केली आहे. शिवसेनेतून आपली राजकीय कारकिर्द सुरू करणारे दिग्रस मतदारसंघाचे माजी आमदार संजय देशमुख यांना उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या गटात ओढून यवतमाळ जिल्ह्याच्या राजकारणात जबरदस्त हलचल निर्माण केली आहे. दोन टर्म आमदार आणि राज्याच्या क्रीडा राज्यमंत्रीपदी काम केलेले संजय देशमुख यांनी आज 'मातोश्री' येथे जाऊन उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधून घेतले. यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा - दिग्रस विधानसभा मतदारसंघात लोकप्रिय असलेले संजय देशमुख आता आगामी विधानसभेत संजय राठोड यांना टक्कर देणार असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे.

तीन महिन्यांपासून होते ठाकरे गटाच्या संपर्कात

दारव्हा-दिग्रस मतदारसंघाचे आमदार संजय राठोड यांच्याप्रमाणेच संजय देशमुख यांचं नेतृत्व शिवसेनेतून पुढे आलं आहे. देशमुख हे काही काळ शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते. या मतदारसंघात बंजारा समाजाची मते निर्णायक ठरतात. पुढील राजकारणात शिवसेनेने संजय राठोड यांना झुकतं माप दिल्याने २००४ साली राठोड यांना दारव्हा मतदारसंघातून आमदारकीचं तिकीट आणि नंतर सलग दोनदा मंत्रीपद मिळालं होतं. संजय देशमुख यांनी दुसरीकडे शिवसेनेत बंडखोरी करत शेजारच्या दिग्रस या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून दोनदा निवडणूक लढवली आणि जिंकली. देशमुख हे १९९९ ते २००९ असे सलग १० वर्ष दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. मात्र २००९ साली मतदारसंघ पुनर्रचनेनंतर दोन्ही मतदारसंघ एक झाले आणि यात संजय राठोड विरुद्ध संजय देशमुख या लढाईत राठोड यांनी बाजी मारली होती. मात्र, दिग्रसमधील नगरपालिका, पंचायत समिती, बाजार समिती, खरेदी-विक्री संघ अशा ठिकाणी संजय देशमुखांनी वेळोवेळी आपली ताकद दाखवली आहे. २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत संजय देशमुखांनी संजय राठोडांच्या विरोधात अपक्ष लढून ७५ हजार मतदान घेतलं होतं.

जून २०२२ साली एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर संजय राठोड यांनी शिंदे गटासोबत जाणं पसंत केलं होतं. त्यामुळे जिल्ह्यातील कट्टर शिवसेैनिकांचा एक मोठा गट नाराज असल्याचं चित्र होतं. शिवसेनेतील घडामोडीनंतर संजय देशमुख सक्रिय झाले होते. अकोला येथे दौऱ्यावर आलेले शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्यासोबत भेट घेतली होती. तत्पूर्वी देशमुख यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना भेटले असल्याचं बोललं जातं. आता देशमुख यांनी अधिकृत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे दिग्रस मतदारसंघात मंत्री संजय राठोड यांना मात देण्यासाठी पुन्हा संजय देशमुख यांना पुढे आणण्याचा शिवसेनेचा प्लॅन असल्याचं बोललं जात आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या