Maharashtra Assembly Elections 2024 : निवडणुकीची घोषणा झाल्यापासून राज्यात पक्षांतराची लाट आली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्यासाठी अक्षरश: रांग लागली आहे. रोजच्या रोज नवनवे नेते पवारांना भेटत आहेत. माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी आज शरद पवार यांची भेट घेऊन तुतारी हाती घेण्याची घोषणा केली. त्यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार तोफ डागली.
लक्ष्मण ढोबळे हे सोलापूरचे माजी पालकमंत्री आहेत. शरद पवार यांचे ते सुरुवातीपासूनचे सहकारी होते. २०१९ च्या निवडणुकीच्या आधी ते राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले होते. त्यावेळी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. मात्र, हा निर्णय त्यावेळी का घेतला होता हे सांगताना ढोबळे यांनी अजित पवारांकडं बोट दाखवलं. ते वृत्तवाहिन्यांशी बोलत होते.
लक्ष्मण ढोबळे यांनी यावेळी अजित पवारांवर बोचरी टीका केली. 'सासूबरोबर वाद झाला की आपण बाजूला राहावं असा विचार सून करते. त्याच पद्धतीनं मी बाजूला राहण्याचा विचार केला, पण वाटणीला पुन्हा सासूच आली. हे लक्षात आल्यानंतर मी अजित पवारांना नमस्कार करायचं ठरवलं आहे. ज्या माणसानं इतका त्रास दिला, इतकं आमचं नुकसान केलं, अशा फटकळ माणसाच्या तोंडाला लागण्यापेक्षा आणि तिथं सातत्यानं अपमानित होण्यापेक्षा मी त्यांना श्वास घ्यायला मोकळी जागा देतोय. आपल्या अपमानावर कुणाचा अहंकार पोसला जात असेल तर तो त्यांना लखलाभ असो, असं ते म्हणाले.
‘केवळ पक्षाच्या जिवावर राजकारण करता येतं असं अजित पवारांना वाटतं. त्यांनी स्वत:च्या काकांकडं पाहायला हवं. पण काकांचा त्याग आणि ७० हजार कोटींचं घबाड याकडं ते एकाच नजरेनं बघतात, असं ढोबळे म्हणाले. ‘पक्षात असताना आणि पक्षाबाहेर असतानाही अजित पवारांनी त्रास दिला म्हणून मी आता त्यांचा नाद सोडतोय,’ असं त्यांनी सांगितलं.
लक्ष्मण ढोबळे यांचे चिरंजीव अभिजित ढोबळे हे मोहोळ विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र, तिथं अजित पवारांच्या पक्षाचा विद्यमान आमदार आहे. अजित पवार हे महायुतीत असल्यानं आता तिथं ढोबळे यांना उमेदवारी मिळणं अवघड आहे. हे लक्षात आल्यानं ढोबळे यांनी पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. तिकीट मिळालं नाही तरी चालेल पण शरद पवारांसोबतच जाणार. त्यांनी माझ्या मुलाला आधार द्यावा, असं ढोबळे यावेळी म्हणाले.
संबंधित बातम्या