Pratap Dighavkar : माजी IPS अधिकारी प्रताप दिघावकर भाजपमध्ये प्रवेश करणार; धुळ्यातून लोकसभेची निवडणूक लढण्याची शक्यता
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pratap Dighavkar : माजी IPS अधिकारी प्रताप दिघावकर भाजपमध्ये प्रवेश करणार; धुळ्यातून लोकसभेची निवडणूक लढण्याची शक्यता

Pratap Dighavkar : माजी IPS अधिकारी प्रताप दिघावकर भाजपमध्ये प्रवेश करणार; धुळ्यातून लोकसभेची निवडणूक लढण्याची शक्यता

Updated Aug 02, 2023 01:57 PM IST

Pratap Dighavkar Join BJP : माजी आयपीएस अधिकारी आणि एमपीएससीचे माजी सदस्य प्रताप दिघावकर हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Pratap Dighavkar Join BJP
Pratap Dighavkar Join BJP (HT)

Pratap Dighavkar to Join BJP : मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा छडा लावत जबरदस्त तपास करणारे माजी आयपीएस अधिकारी प्रताप दिघावकर हे आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. २६/११ च्या हल्ल्याच्या तपासात प्रसिद्धी मिळवलेले अधिकारीच भाजपमध्ये येणार असल्याने उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठा बूस्टर मिळणार असल्याचं बोललं जात आहे. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रताप दिघावकर हे भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. दिघावकर यांनी पोलीस दलात प्रदीर्घ सेवा दिलेली आहे. तसेच ते एमपीएससीचे सदस्य देखील राहिलेले आहेत. त्यामुळं आता भाजपकडून त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू झाल्याची चर्चा आहे.

प्रताप दिघावकर हे मुंबईतील कार्यक्रमात भाजपात प्रवेश करणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रताप दिघावकर हे पक्षप्रवेश करणार आहे. त्यानंतर आता दिघावकर यांना भाजपाकडून धुळे लोकसभा मतदारसंघाचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे. 

मोदी सरकारच्या कामामुळं प्रभावित

भाजप प्रवेशाबद्दल प्रताप दिघावकर यांनीही आपली भूमिका मांडली आहे. 'गेल्या काही वर्षांपासून पायाभूत सुविधा आणि जीडीपीत झालेल्या सुधारणांमुळं मी प्रभावित झालेलो आहे. भारताला पूर्वी सॉफ्ट स्टेट असं म्हटलं जायचं, परंतु आता सर्जिकल स्ट्राईकमुळं देशाची प्रतिमा बदलली आहे. मोदी यांच्या कार्यकाळात भारताची प्रतिमा उंचावत आहे, असं दिघावकर यांनी म्हटलं आहे. प्रताप दिघावकर यांचा लोकसंपर्कही उत्तम असून ते धुळे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती आहे.

प्रताप दिघावकर हे नाशकातील सटाण्यात १९८७ साली पोलिस उपअधीक्षक म्हणून रुजू झाले होते. २००१ साली त्यांनी आयपीएस म्हणून सेवा देण्यास सुरुवात केली. पुणे आणि रायगडमध्ये त्यांनी पोलीस अधिक्षक तर मुंबईचे उपायुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिलेलं आहे. महानिरीक्षकपदी बढती मिळाल्यानंतर त्यांची नाशिक परिक्षेत्रात नियुक्ती झाली. निवृत्तीनंतर दिघावकर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून काम केलेलं आहे. परंतु मे महिन्यात त्यांचा कार्यकाळ संपला होता. त्यानंतर आता ते पोलीस दलानंतर भाजपात प्रवेश करत नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या