Uddhav Thackeray : ‘नांदेडच्या घटनेने अस्वस्थ आणि उद्विग्न झालोय, सरकारची CBI चौकशी करा’
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Uddhav Thackeray : ‘नांदेडच्या घटनेने अस्वस्थ आणि उद्विग्न झालोय, सरकारची CBI चौकशी करा’

Uddhav Thackeray : ‘नांदेडच्या घटनेने अस्वस्थ आणि उद्विग्न झालोय, सरकारची CBI चौकशी करा’

Oct 06, 2023 01:20 PM IST

Uddhav Thackeray Live : आरोग्य यंत्रणेला हाताशी धरून आम्ही जग व्यापणाऱ्या कोरोनाचा सामना केला. परंतु सत्तांतर होताच दुर्दशा चव्हाट्यावर आल्याचं ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray Live Speech Today
Uddhav Thackeray Live Speech Today (Vijay Bate)

Uddhav Thackeray Live Speech Today : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक शहरांमधील रुग्णालयांत रुग्णांचे झपाट्याने मृत्यू होत असल्याच्या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. त्यामुळं विरोधकांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली जात असून सरकारच्या गलथान कारभारामुळंच सामान्यांचा बळी जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यातच आता राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत नांदेड, संभाजीनगर आणि नागपूर येथील घटनांवर भूमिका मांडली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यातील काही रुग्णालयांत लोकांचे मृत्यू होत असल्याने मी अस्वस्थ आणि उद्विग्न आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा वाजलेले असून स्थिती पाहून संताप येतोय. महाविकास आघाडीचं सरकार असताना जग व्यापून टाकणाऱ्या कोरोनाच्या संकटाचा याच आरोग्य यंत्रणेने सामना केला. परंतु सरकार बदलताच महाराष्ट्राची दुर्दशा चव्हाट्यावर आल्याचं सांगत उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीसांवर तिखट शब्दांत टीका केली आहे. याशिवाय नांदेड, संभाजीनगर आणि नागपूर येथे झालेल्या मृत्यूंची सीबीआय चौकशी करण्याची मागणी देखील उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

सरकारकडे यांच्या जाहिराती करायला, गुवाहाटी-गुजरातला मौजमस्ती करायला पैसे आहेत. गोव्यात टेबलावर नाचायला पैसे आहेत. परंतु राज्यातील सामान्य लोकांचे जीव वाचवण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत. त्यामुळं या सरकारचीच सीबीआय चौकशी करण्याची गरज असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. केवळ पोस्टर्स किंवा बॅनरवर दिसतील, असे आरोग्यमंत्री यांच्याकडे आहेत. जाहिराती, आमदार-खासदारांची अदलाबदली करायला यांच्याकडे पैसे आहेत, परंतु औषधं खरेदी करायला पैसे नाहीत, हे सगळं संतापजनक असून यांची चौकशी व्हायला हवी, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या