Maharashtra Assembly Elections 2024 : राज्यात आज लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. आज सकाळी ७ पासून विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र, आज राज्यात अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवर ईव्हीएम बिघाडीच्या तक्रारी मिळाल्या. काही ठिकाणी मतदार रांगेत लागले होते. मात्र, मशीन सुरू न झाल्याने त्यांना माघारी जावे लागले.
राज्यात सकाळी मतदान सुरू झाल्याच्या काही वेळातच अनेक ठिकाणावरून ईव्हीएम बिघडीच्या तक्रारी येऊ लागल्या. पुणे, कोल्हापूर, अकोला, संभाजी नगर आदी जिल्ह्यात नागरिकांनी ईव्हीएम बंद पाडल्याच्या तक्रारी केल्या. यामुले काही ठिकाणी मतदान सुरू होऊ शकले नाही. तर काही ठिकाणी अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ मतदान खोळंबले होते. त्यामुळे मतदान रखडले होते.
मुंबईत दादर येथे ईव्हीएम बंद पडल्याने मतदान खोळंबले होते. नाबर विद्यालयातील ईव्हीएम मशीन बंद पडले. मतदान सुरू होऊन अवघे १५ मिनिटे झाले असताना मशीन बंद पडले. यामुळे मतदारांचा खोळंबा झाला. तर शिवडीमध्येही ईव्हीएम मशीन बंद पडले होते. शिवडी-लालबाग विधानसभा मतदारसंघातील आरएम भट शाळेतील मतदान केंद्र क्रमांक ४१ ची मशीन बंद पडली होती. तर प्रबोधनकार ठाकरे उद्यान येथील मतदान केंद्रावर विद्युत पुरवठा अपूरा असल्यामुळे मतदान सुरू होऊ शकले नाही.
जळगावच्या जामनेरमधील मतदान केंद्रावर देखील ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदान रखडले होते. येथील न्यू इंग्लिश स्कूल मतदान केंद्रावर मतदान यंत्र सुरू होत नव्हते. त्यामुळे अर्धा तास उशिरा या ठिकाणी मतदान सुरू झाले. ईव्हीएम मधील बिघाड दुरुस्त करण्यासाठी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या वतीने तांत्रिक कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आलं. मशीन सुरू झाल्यानंतर ते सिल करून येथे मतदान सुरू करण्यात आले. तो पर्यंत नागरिक बाहेर थांबून होते.
छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील ईव्हीएममध्ये बिघाड झाला. चार ठिकाणी मतदान प्रक्रिया यामुळे थांबली होती. पीर बावडा फुलंब्री मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड झाला तर आणखी २ ठिकाणी कंट्रोल युनिट बिघाड झाला होता. तर एका ठिकाणी व्हीव्हीपॅट आई ४ ठिकाणी बॅलेट मशीनमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे मतदान रखडले होते.
नाशिक जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी ईव्हीएम बिघडाच्या तक्रारी मिळाल्या. येवल्यात मतदान यंत्रात बिघाड झाला होता. तर जनता महाविद्यालयातील मतदान यंत्रात बिघाड झाल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. पंचवटीतील सोनुबाई केला मतदान केंद्रावरील १८९ बूथवर तांत्रिक बिघाड झाला होता. या तांत्रिक बिघाडामुळे मतदानाला अर्धा तास उशीर झाला.
अकोला जिल्ह्यातील बाळापुर मतदार संघातील वाडेगाव येथील मतदान केंद्र क्रमांक २०८ वर अद्यापही मतदानाला सुरुवात झाली नाही. तांत्रिक बिघाडामुळे अजूनही मतदानाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे सकाळी मतदान केंद्रात आलेले अधिकारी वैतागून मतदान न करता घरी निघून गेले.
पुण्यात देखील कोथरूड येथे एका ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड झाला. त्यामुळे या ठिकाणी उशिरा मतदान सुरू झाले.