मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  EVM New : 'ईव्हीएम हटाव' ही लोकशाही वाचवण्याची लढाई; मुंबईतील आंदोलनात विरोधाचा सूर बुलंद

EVM New : 'ईव्हीएम हटाव' ही लोकशाही वाचवण्याची लढाई; मुंबईतील आंदोलनात विरोधाचा सूर बुलंद

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Feb 10, 2024 09:19 PM IST

Prakash Pohare on EVM Hatao : मुंबईतील आझाद मैदानात सुरू असलेल्या ईव्हीएम हटाव धरणे आंदोलनाला शुक्रवारी ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे यांनी मार्गदर्शन केलं.

Prakash Pohare on EVM
Prakash Pohare on EVM

EVM Hatao Andolan at Azad Maidan : 'ईव्हीएमला अनेकांचा विरोध आहे. जनतेच्या या विरोधाची दखल घेऊन सरकारनं निवडणुकीसाठी मतदान पत्रिका लागू करावी. अन्यथा सर्व मतदान केंद्रामध्ये उठाव आणि उद्रेक अटळ राहील, असा इशारा ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे यांनी आज मुंबईत दिला.

ईव्हीएम हटाओ कृती समितीतर्फे आझाद मैदानात आयोजित धरणे आंदोलनात ते बोलत होते. दिल्लीत वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखालील भारत मुक्ती मोर्चानं केलेल्या ईव्हीएम विरोधी आंदोलनातही पोहरे सहभागी झाले होते. मुंबईतील धरण्याला त्यांनी विशेष अतिथी म्हणून मार्गदर्शन केलं.

‘ईव्हीएम हटाओ आंदोलन ही देशाची लोकशाही वाचवण्याची लढाई आहे. ईव्हीएमच्या जागी मतदान पत्रिका आल्याशिवाय देशात सत्तांतर घडण्याची आशा विरोधी पक्ष आणि जनतेला सोडून द्यावी लागेल. यंदाची लोकसभा निवडणूक ही कदाचित शेवटची निवडणूक ठरू शकते,’ अशी भीती पोहरे यांनी व्यक्त केली.

'भाजपनं २०१९ मध्ये तीनशेच्या पुढं जागा जिंकण्याचा नारा दिला आणि ३०३ जागा जिंकून तो खरा करून दाखवला. आता त्यांनी ४०० पारचा नारा दिला आहे. ८० टक्के जनतेत असंतोष व्यक्त होत असताना ठरवतील तितक्या जागा जिंकण्याचा आत्मविश्वास भाजपमध्ये कुठून येतो, असा प्रश्न पोहरे यांनी उपस्थित केला.

ईव्हीएम हटाव लढ्यात सर्वांनी सहभागी व्हावं!

'लोकशाही टिकणार नसेल तर देशाचे काय होईल, याची कल्पना करावी . अन लोकशाही वाचवण्यासाठी ईव्हीएम हटवण्याच्या लढ्यात सर्वांनी सामील व्हावे, असं आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी यावेळी केलं.

या लढ्यात लोकशाहीवादी आंबेडकरी - बौद्ध समाज अग्रभागी राहणं हे स्वाभाविक आहे. पण ही लढाई सर्व भारतीयांची आहे, याचा विसर पडू देऊ नका. बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल या संघटना प्रत्येक ठिकाणी होणाऱ्या ईव्हीएम विरोधी आंदोलनात ताकदीनं उतरल्या आहेत, असंही आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ, प्रा. प्रेमरत्न चौककर, सुनील कदम हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. आझाद मैदानातील बेमुदत धरण्याचं नेतृत्व अशोक कांबळे, सुरेश प्र आंभोरे, प्रमोद नाईक, नामदेव साबळे, गजानन शिरसाट, शशांक कांबळे, अविनाश समिंदर, सचिन साठे हे करत आहेत.

शेकडो मान्यवरांचा आंदोलनाला पाठिंबा

शेकडो कार्यकर्त्यांनी आझाद भेट देऊन या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यात संविधान समर्थक दलाचे सरचिटणीस सतीश डोंगरे, फिरोझ मिठीबोरवाला, सुमेध जाधव, पल्लवी गायकवाड, आकाश गांगुर्डे, उत्तमराव गायकवाड, शिवाजीराव भोसले, चंद्रसेन कांबळे, सीताराम लवांडे यांचा समावेश होता.

WhatsApp channel

विभाग