मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Shinde : मंत्रिमंडळाच्या विस्तारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले...

Eknath Shinde : मंत्रिमंडळाच्या विस्तारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले...

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 25, 2022 01:14 PM IST

Eknath Shinde On Cabinet Expansion : येत्या काही दिवसांतच राज्य मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार होणार आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Eknath Shinde On Cabinet Expansion In Maharashtra
Eknath Shinde On Cabinet Expansion In Maharashtra (HT)

Eknath Shinde On Cabinet Expansion In Maharashtra : राज्यात शिंदे-फडणवीस सरकारला स्थापन होऊन तीन महिन्यांपेक्षा अधिकचा काळ लोटला आहे. परंतु मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार झाल्यानंतर अजूनही दुसरा विस्तार करण्यात आलेला नाही. त्यामुळं आता शिंदे गटासह भाजपमधील नाराज नेत्यांचं मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या विस्ताराकडे लक्ष लागलेलं आहे. त्यातच आता गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या विस्तारावर प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नागपूरात आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यात ते बोलताना म्हणाले की, प्रत्येक गोष्ट योग्यवेळी होत असते, मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तारही होणारच आहे. या विस्तारात मात्र सर्वांचा विचार केला जाणार असल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत दिले आहेत. त्यामुळं आता राज्यातील दुसरा कॅबिनेट विस्तार लवकरच होण्याची शक्यता आहे.

मी जेव्हा गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री होतो तेव्हा मी दरवर्षी गडचिरोली पोलिसांसोबत दिवाळी साजरी करायचो. आज मी राज्याचा मुख्यमंत्री आहे, परंतु मी ते काम अजूनही सुरुच ठेवल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात नक्षलवाद कमी होत असून गडचिरोली उद्योगधंदे आणण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठीही सरकार काम करत असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

असंतुष्ट आमदारांना संधी मिळणार?

शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर शिंदे गटातील अनेक आमदारांची नाराजी चव्हाट्यावर आली होती. त्यात आमदार संजय शिरसाट यांच्यासह अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांसमोर मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. याशिवाय भाजपमधीलही काही आमदारांना मंत्रिपदाची आस लागलेली असल्यानं आता पुढच्या विस्तारात कुणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

IPL_Entry_Point