EOW Probe against Shiv Sena UBT : शिवसेनेच्या पक्ष निधीतून ५० कोटी रुपये काढल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर करण्यात आला असून या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं (EOW) चौकशी सुरू केली आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला मूळ शिवसेना म्हणून मान्यता दिली होती. त्यामुळं साहजिकच शिवसेनेच्या पक्षनिधीवर शिंदे गटाचा हक्क होता. मात्र, निवडणूक आयोगानं निर्णय दिल्यानंतरही ठाकरेंच्या शिवसेनेनं पक्ष निधीतून ५० कोटी रुपये काढले. या विरोधात शिंदे गटानं तक्रार दाखल केली आहे.
आर्थिक गुन्हे शाखेनं या संदर्भात चौकशी सुरू केली आहे. ठाकरेंच्या यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचं विवरणपत्र कोण भरतं याची माहिती ईओडब्लूनं प्राप्तिकर विभागाला पत्र लिहून मागवली आहे. मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं गेल्या महिन्यात मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेऊन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. ठाकरेंची शिवसेना पक्षाचा पॅन आणि टॅन तपशीलांचा गैरवापर करत आहे. शिवसेनेचा टीडीएस आणि आयकर विवरणपत्र फसवणुकीनं भरत आहे, असं तक्रारीत म्हटलं होतं.
केंद्रीय निवडणूक आयोगानं व त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही शिवसेना हा पक्ष आणि पक्षाचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला बहाल केल्यानंतरही हा वाद मिटलेला नाही. कायदेशीर लढाई सुरूच आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं या निर्णयांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. यावर निकाल कधी लागणार याबाबत संभ्रम आहे. मात्र, एकीकडं कायदेशीर लढाई सुरू असताना दुसरीकडं दोन्ही गट एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहेत.
संबंधित बातम्या