Posari News : म्हणतात ना माणसाचा मृत्यू झाला की त्याचे सर्वांसोबत असलेले वैर देखील संपते. मात्र, रसायनी- वासांबेतील नवीन पोसरी गावात माणुसकीला काळिमा फसणारी एक घटना उघडकीस आली आहे. वाहिवाटी रस्त्यावरून वाद असल्याने शेजारच्या व्यक्तीच्या अंत्ययात्रेला रस्ता न दिल्याने कुटुंबीयांना मृतदेह हा भिंतीवरून उचलून न्यावा लागला. या घटनेमुळे ग्रामस्थांनी देखील संताप व्यक्त केला.
मरणान्ती वैराणी असे भारतीय संस्कृती सांगते. मात्र, या घटनेमुळे माणुसकी कुठे चालली हा प्रश्न उपस्थित होत आहे. रसायनी- वासांबेतील नवीन पोसरी गावात खारकर आळीमध्ये खंडू हाल्या खारकर आणि रघुनाथ शंकर पाटील शेजारी-शेजारी राहतात. खारकर आणि इतर शेजाऱ्यांचा वहिवाटीचा रस्ता पाटील यांच्या दारातून जातो.
खंडू खारकर यांचे ४ जानेवारीला निधन झाले. अंत्ययात्रा नेण्यासाठी त्यांच्या नातेवाइकांनी रघुनाथ पाटील यांना तात्पुरता रस्ता खुला करण्याची विनंती केली. मात्र, त्यांचा मुलगा नीतेश यांनी याला स्पष्ट नकार दिला. अंत्ययात्रा नेण्यासाठी रस्ता न दिल्याने नातेवाइकांनी भिंतीवरून खंडू खारकर यांचा मृतदेह उचलून एकमेकांकडे देत अंत्ययात्रा नेली. हे दृश्य मन हेलावून सोडणारे होते.
शेवटच्या क्षणी देखील मृतदेहाची झालेली हेळसांड पाहून ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. गावातील नागरिकांनी याला प्रशासनाला जबाबदार धरले. जर प्रशासाने या बाबत वेळीच लक्ष घातले असते, तर ही वेळ आली नसती. दरम्यान, माणुसकीला काळिमा फासणाऱ्या रघुनाथ पाटील आणि त्यांच्या मुलाच्या वागणुकीमुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील ग्रामस्थांनी केली. तर या घटनेनंतर तहसीलदारांनी लक्ष देहून लवकर वहिवाटीचा रस्ता मोकळा करून द्यावा, अशी मागणी देखील त्यांनी केली. वहिवाटीचा जुना रस्ता त्यांनी बंद केला आहे. यासाठी आम्ही उपोषणही केले होते. त्यावेळी तहसीलदारांनी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेतले होते.