Endangered Parrots : जगातील सर्वात आकर्षक पोपट नामशेष होण्याच्या मार्गावर; पुस्तकातून वेधले लक्ष
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Endangered Parrots : जगातील सर्वात आकर्षक पोपट नामशेष होण्याच्या मार्गावर; पुस्तकातून वेधले लक्ष

Endangered Parrots : जगातील सर्वात आकर्षक पोपट नामशेष होण्याच्या मार्गावर; पुस्तकातून वेधले लक्ष

Dec 23, 2024 07:39 PM IST

Endangered Parrots News : बेसुमार जंगलतोड, पक्ष्यांचा बेकायदेशीर व्यापार, हवामानात होणारे बदल आणि अधिवास नष्ट होत असल्यामुळे आकर्षक, रंगीबेरंगी अशा दुर्मिळ पोपटांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

जगात नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले पोपट
जगात नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले पोपट

जगभरात प्रचंड प्रमाणात होणारी जंगलतोड, पक्ष्यांचा बेकायदेशीर व्यापार, हवामान बदल आणि पक्ष्यांचे अधिवास नष्ट होत असल्याने आकर्षक, रंगीबेरंगी पोपटांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पोपटांना भेडसावणाऱ्या गंभीर धोक्यांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने मिंटेज वर्ल्ड संस्थेतर्फे 'एन्डेंजर्ड पॅरट्स ऑफ द वर्ल्ड ऑन स्टॅम्प्स, कॉइन्स अँड बँकनोट्स' हे कॉफी टेबल पुस्तक नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहे. या पुस्तकात पोपट पक्षावर विविध देशांमध्ये जारी करण्यात आलेली नाणी, टपाल तिकिटे आणि चलनी नोटांचे दुर्मीळ असा संग्रह समाविष्ट करण्यात आला आहे. पुस्तकात ४५९ टपाल तिकिटे, ३७ नाणी आणि १२ चलनी नोटांची छायाचित्रे असून प्रत्येक तिकीट, नाणे आणि नोटांवर जगभरातील पोपटाच्या विविध प्रजाती दर्शविलेल्या आहे. 

या पुस्तकामध्ये डॉमिनिक रिपब्लिक देशातील दुर्मिळ इंपीरियल अॅमेझॉन पोपट (Imperial Amazon Parrot), आफ्रिकन ग्रे पोपट (African Grey Parrot), फिलीपिन्सचा कॉकटू पोपट (Cockatoo) आणि ब्राझीलमधील लिअर्स मकाव पोपट (Lear's Macaw) याचा समावेश आहे. प्रत्येक तिकिट, नाणे आणि नोटेसोबत पोपटाविषयी ऐतिहासिक आणि भौगोलिक माहिती सविस्तर देण्यात आली आहे. पक्षीप्रेमींसाठी हा एक कलात्मक आणि मौल्यवान माहितीचा ठेवा ठरू शकतो.

इंटरनॅशनल यूनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर संस्थेद्वारे जुलै २०२४ मध्ये जारी करण्यात आलेली 'रेड लिस्ट ऑफ थ्रेटन्ड स्पिशीज'ची यादी या पुस्तकात देऊन नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या या पोपटांच्या जातीचे संवर्धन करण्याची तातडीची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.

या पुस्तकाबद्दल माहिती देताना 'मिंटेज वर्ल्ड'चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे सदस्य सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले, ‘भारतात प्राचीन ग्रंथ, चित्रकला, महाकाव्ये आणि लोककथांमध्ये पोपटांना विशेष स्थान देण्यात आले आहे. या पक्ष्यांबाबतच्या कथा जगभरात शोधून त्यांचे दस्तऐवजीकरण करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.  विशेषतः पोपटांचा बेकायदेशीरपणे होणारा व्यापार हे एक धक्कादायक वास्तव असून त्यावरही पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे. हे एक केवळ फोटोसंग्रह नसून पोपटांसंदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी केलेला प्रयत्न आहे. या पुस्तकाद्वारे पोपट या सुंदर पक्षाचे संवर्धन आणि त्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्याचे आमचे प्रयत्न आहे. संग्रहातील प्रत्येक तपशील हा अचूक आणि विश्वसनीय पद्धतीने तयार करण्यात आला आहे’ असं अग्रवाल म्हणाले.

मिंटेज वर्ल्ड हे प्राचीन आणि आधुनिक नाणी, टपाल तिकिटे आणि चलनी नोटांसाठीचे जगातील पहिले ऑनलाइन संग्रहालय आहे. जगभरातील तरुण पिढीला नाणी, चलनी नोटा आणि टपाल तिकिटे गोळा करण्याच्या आनंदाचा नव्याने परिचय करून देण्यासाठी हे संग्रहालय सुरू करण्यात आले. प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारत तसेच जगाचा समृद्ध ऐतिहासिक वारसा, परंपरा आणि संस्कृतीविषयी माहिती देणारे हे एक प्रभावी व्यासपीठ आहे. मिंटेज वर्ल्डच्या वेबसाइटवर १,२५,५००हून अधिक नाणी, ७,३०० टपाल तिकिटे आणि ३,००० चलनी नोटांची सविस्तर आणि वर्गीकृत माहिती देण्यात आली असून त्याचा व्हर्च्युअल पाहण्याचा अनुभव वाचक घेऊ शकतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर