Encounter between police and Naxalites : गडचिरोलीत जिल्ह्यातील छिंदभट्टी आणि छत्तीसगडच्या सीमेवरील जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक घडली. या कारवाईत सुरक्षा दलाने १२ नक्षलावाद्यांचा खात्मा केला असून एक उपनिरीक्षक जखमी झाला आहे. अलिकडच्या काळातील सर्वांत मोठे ऑपरेशन असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरक्षा दलासाठी ५१ लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.
गडचिरोली व छत्तीसगड सीमेवरील जंगलात बुधवारी (१७ जुलै) रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास जवान आणि नक्षल्यांत चकमक झाली. उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवारआज गडचिरोली दौऱ्यावर होते. त्यांचा दौरा आटोपताच ही चकमक झाली.
दुपारी २ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत सहा तास सुरक्षा दल व नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. रात्री ८ वाजता चकमक थांबली. त्यानंतर परिसरात शोधमोहीम घेतली असता १२ नक्षलींचे मृतदेह आढळून आले. घटनास्थळी ३ एके-४७, २ बंदुका, १ कार्बाईन, १ एसएलआर, ७ ऑटोमोटिव्ह शस्त्रे आढळून आली आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व उद्योगमंत्री उदय सामंत आज अहेरी तालुक्यातील वडलापेठ येथे स्टील निर्मिती प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठीआले होते. कार्यक्रमानंतर ते जिल्ह्याच्या बाहेर पडल्यानंतर महाराष्ट्र छत्तीसगडच्या सीमावेरील जंगल परिसरात सी ६० पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना इंटला गावाजवळ जंगलात दबा धरून असलेल्या नक्षल्यांनी गोळीबार सुरु केला.
सुरक्षा दलाने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात १२ नक्षली ठार झाले. या चकमकीत एक पोलिस उपनिरीक्षक जखमी असून त्यांना उपचारासाठी हेलिकॉप्टरने नागपूर येथे हलविण्यात आलेआहे. सतीश पाटील असे जखमी उपनिरीक्षकाचे नाव आहे. त्यांच्या डाव्या खांद्याला गोळी लागली असून सध्या त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. चकमकीत १२ नक्षली ठार झाल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.
दरम्यान, गेल्या काही वर्षांतील ही सर्वांत मोठी चकमक असून गडचिरोली पोलिसांच्या कामगिरीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले आहे. त्यांनी सी- ६० जवानांना ५१ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. वांडोली गावाजवळ नक्षलवादी लपले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सी-६० पथकाने शोधमोहीम राबवली.
संबंधित बातम्या