DGP Rashmi Shukla transfer : राज्यात विधानसभा निवडणूक चांगलीच रंगात आली आहे. आज अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख आहे. दरम्यान, अनेक उमेदवार अर्ज माघारी घेण्याच्या तयारीत असतांना मोठी बातमी पुढे आली आहे. राज्याच्या पोलिस महासंचालिका रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने या बाबत आदेश दिले आहेत. तसेच उद्या ५ नोव्हेंबर दुपारी १ वाजेपर्यंत तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची नावे राज्याच्या प्रशासनाने केंद्रीय निवडणूक आयुक्तांना पाठवायचे आहेत. त्यानंतर राज्याच्या नव्या पोलीस महासंचालकांची निवड केली जाणार आहे.
राज्यात आचार संहिता लागू झाल्यानंतर तब्बल २८ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यातील १५ अधिकारी हे मुबंईतील होते. पोलीस महासंचालकांनी राज्यभरातील ३०० हून अधिक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या होत्या. पण राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली नव्हती. रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली होती.
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. मात्र, डीजीपी, पोलीस महासंचालक यांची बदली करण्यात आली नव्हती. त्यामुळे २० नोव्हेंबरपूर्वी त्यांची बदली करण्याची मागणीरश्मी शुक्ला काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती. रश्मी शुक्ला या वादग्रस्त अधिकारी असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रश्मी शुक्ला यांच्या बदलीसाठी आयोगाला पत्र देखील पाठवले होते. रश्मी शुक्ला जोपर्यंत या पदावर आहेत, तोपर्यंत राज्यात निष्पक्ष निवडणूक होणे अवघड असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता.
अखेर निवडणूक आयोगाने या मागणीची दखल घेतली आहे. काँग्रेस आणि इतर पक्षांच्या तक्रारींवर कारवाई करून, भारतीय निवडणूक आयोगाने डिजीपी रश्मी शुल्का यांची तत्काळ बदली करण्याचे आदेश दिले. या प्रकरणी मुख्य सचिवांना निर्देश देऊन त्यांचा पदभार पुढील सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याकडे सोपवण्यात यावा असे आदेश दिले. मुख्य सचिवांना डीजीपी महाराष्ट्र म्हणून नियुक्तीसाठी उद्या १ वाजेपर्यंत तीन आयपीएस अधिकाऱ्यांचे पॅनेल पाठवण्याचे आदेश देखील निवडणूक आयोगाने दिले आहेत.
रश्मी शुक्ला या फोन टॅपिंग प्रकरणी वादग्रस्त ठरल्या होत्या. दरम्यान, रश्मी शुक्लांच्या बदलीविषयी प्रश्न विचारलं असता यापूर्वी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी टाळाटाळ केली होती. त्यामुळे आयोगावर कॉंग्रेस पक्षाने नैतिक दबाव निर्माण केला होता. शुक्ला यांचा कार्यकाळ जून २०२४ ला संपला होता. त्यांना २०२६ पर्यंत एक्स्टेंशन देण्यात आलं होतं. नियमानुसार जास्तीत जास्त ६ महिन्याची मुदतवाढ देता येते.
रश्मी शुक्ला यांची बदली केल्याने नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाचे आभार मानले आहे. नाना पटोले म्हणाले, 'पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची बदली केल्याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार. रश्मी शुक्ला या भाजपचं काम करायच्या. निवडणुकीत फायद्या मिळवण्यासाठी भाजपने त्यांना त्या ठिकाणी बसवलं होतं. त्या विरोधकांचे फोन टॅप करायच्या. रश्मी शुक्लांची बदली करण्यासाठी इतके दिवस का लागले, हा प्रश्न अनुत्तरित आहे. ज्या पद्धतीने केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीपूर्वी झारखंड आणि पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक बदलले होेते, तसं महाराष्ट्रात आधीच का केलं नाही? आता रश्मी शुक्लांना निवडणुकीच्या कुठलेही काम देता कामा नये, अशी आमची मागणी आहे असे पटोले म्हणाले.