Iqbal Singh Chahal: निवडणूक आयोग अ‍ॅक्शन मोडमध्ये; मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची उचलबांगडी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Iqbal Singh Chahal: निवडणूक आयोग अ‍ॅक्शन मोडमध्ये; मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची उचलबांगडी

Iqbal Singh Chahal: निवडणूक आयोग अ‍ॅक्शन मोडमध्ये; मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची उचलबांगडी

Mar 18, 2024 03:30 PM IST

Election Commission Of India: निवडणूक आयोगाने गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या ६ राज्यांतील गृहसचिवांना हटवण्याचे आदेश दिले.

Iqbal Singh Chahal
Iqbal Singh Chahal

Iqbal Singh Chahal: देशातील आगामी निवडणुका निष्पक्ष पार पाडव्यात, यासाठी निवडणूक आयोगाने मोठे पाऊल उचलले आहे. निवडणूक आयोगाने गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या ६ राज्यांतील गृहसचिवांना हटवण्याचे आदेश दिले आहेत.याशिवाय, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनाही पदावरून हटवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

निवडणूक आयोगाने नुकताच आगामी लोकसभा निवडणूक आणि ४ राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यावेळी निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांनी आगामी निवडणुकीत गैरप्रकार रोखण्यासाठी कठोर पावले उचलले जातील, असा इशारा दिला होता. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने देशातील निवडणुका निष्पक्ष पार पडाव्यात, यासाठी गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या ६ राज्यांतील गृहसचिवांना हटवण्याचे आदेश जारी केले. यासोबतच मिझोराम आणि हिमाचल प्रदेशमधील सामान्य प्रशासकीय विभागातील सचिव आणि पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालकांना पदावरून हटवण्याचे आदेश दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने इक्बाल सिंह चहल यांच्यासह मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांनाही हटवले आहे. याशिवाय, जीएडी मिझोरामचे सचिव आणि हिमाचल प्रदेशचे सचिव यांनाही हटवले, जे संबंधित मुख्यमंत्री कार्यालयात पदभार सांभाळत आहेत.

महत्त्वाचे म्हणजे, तीन वर्ष पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांची बदल करण्यात येते. चहल यांचा कार्यकाळ तीन वर्षांपेक्षा जास्त झाला होता . मात्र, अपवाद म्हणून त्यांची बदली करण्यात येऊ नये म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. परंतु, निवडणूक आयोगाने त्यांची विनंती मान्य केली नाही.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर