Maharashtra legislative council elections: संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. महाराष्ट्रासह देशात मंगळवारी (७ मे २०२४) लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान झाले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी केंद्रीय निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. कोणत्या दिवशी मतदान होणार? तसेच अर्ज करण्याची आणि अर्ज मागे घेण्याची तारीख जाणून घेऊ.
केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर तर नाशिक विभाग शिक्षक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. या चारही जागांसाठी १० जून २०२४ रोजी मतदान होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २२ मे २०२४ असेल. तर, उमेदवार २७ मे २०२४ पर्यंत अर्ज मागे घेऊ शकतात. १३ जून २०२४ रोजी मतमोजणी होईल. तसेच निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया १८ जूनपर्यंत पूर्ण केली जाईल.
लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात आतापर्यंत तीन टप्प्यात मतदान झाले. रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच ठिकाणी १९ एप्रिल रोजी मतदान झाले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल २०२४ रोजी बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली. यानंतर तिसऱ्या टप्प्यात ७ मे २०२४ रोजी रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले मतदान झाले.
नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड येथे चौथ्या टप्प्यात १३ मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यात २० मे २०२४ रोजी धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण मतदारसंघात मतदान होईल.