केंद्रीय निवडणूक आयोग आज (शुक्रवारी १६ ऑगस्ट) दुपारी ३ वाजता महाराष्ट्र, झारखंडसह इतर दोन राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार आहे. नवी दिल्लीच्या विज्ञान भवनात पत्रकार परिषदेसाठी निवडणूक आयोगाकडून प्रसारमाध्यमांना देण्यात आलेल्या निमंत्रणात कोणत्या राज्यांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईलचा उल्लेख नव्हता.
हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ अनुक्रमे ३ नोव्हेंबर आणि २६ नोव्हेंबर रोजी संपत आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतीपूर्वी ३० सप्टेंबरपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका घेण्याची निवडणूक आयोगाची योजना आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तयारीची पाहणी करण्यासाठी नुकताच जम्मू-काश्मीर आणि हरियाणाचा दौरा केला असला तरी अद्याप महाराष्ट्राचा दौरा केलेला नाही.
झारखंडमध्येही विधानसभा निवडणूक होणार आहे. झारखंड विधानसभेचा कार्यकाळ जानेवारी २०२५ मध्ये संपत आहे. निवडणूक आयोग जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर करण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास जम्मू-काश्मीरमध्ये तब्बल १० वर्षांनंतर निवडणुका होतील, कारण २०१४ मध्ये शेवटची विधानसभा निवडणूक झाली होती.
२०१९ मध्ये नरेंद्र मोदी सरकारने कलम ३७० रद्द केले आणि जम्मू-काश्मीरचे विभाजन करून जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश केले. मात्र, ऑगस्ट २०१९ मध्ये झालेल्या विभाजनानंतर विविध कारणांमुळे विधानसभा निवडणुका होऊ शकल्या नाहीत, त्यात २०२२ मध्ये पूर्ण झालेल्या परिसीमन प्रक्रियेचाही समावेश आहे.
नुकतेच मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाचे शिष्टमंडळ जम्मू-काश्मीरमध्ये आले होते. या दौऱ्यादरम्यान जम्मूत झालेल्या पत्रकार परिषदेत कुमार यांनी तेथे लवकरात लवकर निवडणुका घेण्यास आयोग कटिबद्ध असल्याचे सांगितले होते. जम्मू-काश्मीरमध्ये लवकरात लवकर निवडणुका घेण्यास आम्ही कटिबद्ध आहोत आणि कोणत्याही अंतर्गत किंवा बाह्य शक्तींना निवडणुकीत अडथळा येऊ देणार नाही. जम्मू-काश्मीरमधील सर्व राजकीय पक्ष लवकरात लवकर विधानसभा निवडणुका घेण्याची जोरदार मागणी करत आहेत.
महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. महाराष्ट्र विधानसभेत २८८ सदस्य आहेत. महाराष्ट्रात सध्या महायुतीचे सरकार आहे. झारखंड विधानसभेत ८१ सदस्य आहेत. या राज्यात २०१९ मध्ये निवडणुका झाल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत महविकास आघाडीला मोठे यश मिळाले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत जनता कोणाच्या बाजूने कौल देते? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.