Ajit Pawar vs Sharad Pawar: आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट हा खरा राजकीय पक्ष म्हणून घोषित केला आहे. तसेच पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार यांच्या गटाला दिले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर अजित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर अजित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली. “आमच्या वकिलांनी मांडलेली बाजू ऐकून घेऊन निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्ही विनम्रपणे स्वीकारत आहोत”, असे अजित पवार म्हणाले आहेत. हे ट्विट करताना अजित पवार यांनी आपल्या नावासमोर राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असे लिहिले आहे.
निवडणूक आयोगाने यापूर्वी जो न्याय शिवसेनेच्या शिंदे गटाला दिला आहे, तोच न्याय आता अजित पवार गटाला दिला. आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने विशेष मुभा दिली. येत्या निवडणुकीत शरद पवार गटाला वेगळ्या चिन्हावर आणि नावावर निवडणूक लढवावी लागेल हे स्पष्ट झाले. मिळालेल्या माहितीनुसार, 'मी राष्ट्रवादी पार्टी' हे शरद पवार यांच्या नव्या पक्षाचे नाव असेल आणि 'उगवता सुर्य' हे त्यांच्या पक्षाचे चिन्ह असेल. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही.