लोकसभा निवडणुकीवेळी तुतारी आणि पिपाणी चिन्हामुळे लोकसभेला मोठा गोंधळ झाला होता. पिपाणी चिन्ह असलेल्या उमेदवारांनी हजारो मते घेतल्याने याचा फटका शरद पवार गटाला बसला होता. यानंतर शरद पवार गटाने याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करत पिपाणी चिन्ह गोठवण्यात यावं, अशी मागणी केली होती. यासंदर्भात निवडणूक आयोग काय निर्णय घेणार आहे?या प्रश्नावर निवडणूक आयोगाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
लोकसभेतील चिन्हांचा गोंधळ पाहता शरद पवारांच्या पक्षानं निवडणूक आयोगाकडे पिपाणी चिन्ह गोठवण्याची मागणी केली होती. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. निवडणूक आयुक्तांनी सांगितले की, शरदचंद्र पवार पक्षाने तीन मागण्या केल्या होत्या त्यातील दोन मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. पहिली मागणी राज्य पक्ष म्हणून मान्यता देऊन निधी स्वीकारण्यास मान्यता द्यावी, ही मागणी मान्य करण्यात आली आहे.
त्यांनी दुसरी मागणी तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह वोटिंग मशीनवर लहान दिसतं, ते मोठं करावं अशी होती, ही मागणी मान्य करत त्यांच्याकडून आलेल्या आकाराचे चिन्ह ईव्हीएमवर देणार आहोत.
शरद पवार गटाची तिसरी मागणी ट्रम्पेट हटवावं अशी होती. यावर निवडणूक आयोगानं सांगितलं की, तुतारी वाजवणारा माणूस आणि ट्रम्पेट हे वेगळं दिसतं त्यामुळं हटवता येणार नाही.पिपाणी हे चिन्ह त्यांच्या पक्षाच्या चिन्हाप्रमाणे समान नाही, असं त्यांनी शरद पवार गटाला कळवलं आहे.
निवडणूक आयोगाने शरद पवार गटाची चिन्ह मोठं करण्याची मागणी मान्य केली आहे. या मागणीवर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला लिखित स्वरूपात विचारले होते. त्यांनी दिलेल्या आकारातील पाहिला आकार आम्ही मान्य केला आहे.
शरद पवार गटाची पिपाणी चिन्ह गोठवण्याबाबतची मागणी निवडणूक आयोगाने अमान्य केली आहे. आयोगाने म्हटले की पिपाणी हे चिन्ह पूर्णपणे वेगळे आहे. त्यामुळे त्याला आम्ही हात लावला नाही. ही मागणी अमान्य झाल्यामुळे शरद पवार गटाला विधानसभेलाही ट्रम्पेटचा सामना करावा लागणार आहे. लोकसभेला पिपाणी चिन्हावरील अनेक उमेदवारांना पवारांनी लढवलेल्या मतदारसंघात लक्षणीय मतदान झाले होते. साताऱ्यात तर केवळ पिपाणी चिन्हाला झालेल्या मतांमुळे शरद पवार गटाच्या उमेदवाराचा पराभव झाला होता.
संबंधित बातम्या