Election Commission of India : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीची सुनामी आल्याचं पाहायला मिळालं. महायुतीतील तिन्ही घटक पक्षांनी मोठा विजय मिळवला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून सर्वाधिक फटका काँग्रेस पक्षाला बसला. काँग्रेसने १०१ जागांवर उमेदवार दिले होते मात्र त्यांच्या केवळ १६ जागा निवडून आल्या आहेत. ७.८३ टक्के मतं वाढल्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यानंतर आता निवडणूक आयोगाने नाना पटोलेंच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे.
मतांच्या टक्केवारीतील तफावत गंभीर व चिंताजनक असल्याचे नाना पटोले म्हणाले. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता ५८.२२ टक्के मतदान झाले, त्याच रात्री ११.३० वाजता ते ६५.०२ टक्के तर दुसऱ्या दिवशी २१ नोव्हेंबर रोजी हेच मतदान ६६.०५ टक्के झाल्याचे सांगितले, यात एकूण ७.८३ टक्के वाढ झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. तब्बल ७६ लाख मतांची ही वाढ असून मतदानाचा टक्का कसा वाढला? निवडणूक आयोगाने जिथे मतदान वाढले त्या केंद्राचे व्हिडीओ फुटेज जाहीर करावे. निवडणूक आयोगाने जनतेच्या मतांवर दरोडा टाकला आहे," असा आरोप नाना पटोले यांनी केला होता.
मतदानाच्या दिवशी ५ वाजल्यानंतर मतांची टक्केवारी वाढल्याचे प्रमाण पाहता मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या असल्या पाहिजेत. राज्यातील किती मतदार संघावर अशा रांगा लागल्या होत्या ते निवडणूक आयोगाने पुराव्यासह दाखवावे. असंही नाना पटोले म्हणाले.
निवडणूक आयोगाने एक्सवर पोस्ट करत नाना पटोलेंच्या आरोपावर स्पष्टीकरण दिलं आहे. संध्याकाळी ५ वाजता मतदानाची टक्केवारी ५८.२२ टक्के (अंदाजे) होती आणि अंतिम मतदानाची टक्केवारी ६६.०५ टक्के होती. हे सामान्य आहे कारण संध्याकाळी ६ नंतर रांगेत उभ्या असलेल्या शेवटच्या व्यक्तीने मतदान करेपर्यंत मतदान चालूच असते. २०१९ मध्येही, टक्केवारी संध्याकाळी ५ वाजता ५४.४३ टक्के (अंदाजे) आणि अंतिम वेळी ६१.१० टक्के होती. महाराष्ट्रातील शहरी आणि निमशहरी भागात मोठ्या संख्येने मतदार संध्याकाळी येतात, असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.
झारखंडमध्ये संध्याकाळी ५ वाजेपर्यंत तर महाराष्ट्रात संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान झालं आहे. झारखंडमध्ये, बहुतेक मतदान केंद्रांवर संध्याकाळी ५ वाजता मतदान संपले होते. तेथे मतदानाची वेळ संपताना मतदानाच्या रांगेत फारसे कोणी नव्हते. मात्रमहाराष्ट्रात अनेक मतदान केंद्रांवर सायंकाळी ६ वाजता मतदार रांगेत उभे होते. झारखंडमध्ये तीस हजारांहून कमी मतदान केंद्रे आहेत. महाराष्ट्रात एक लाखाहून अधिक मतदान केंद्रे आहेत, असंही निवडणूक आयोगाने म्हटलं.