Elderly Man Dies by Acid Attacked: जालनाच्या जाफ्राबाद तालुक्यातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आलीय. म्हसरुल गावात अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या वृद्ध व्यक्तीचा १७ दिवसांनी उपचारदरम्यान मृत्यू झालाय. काळ्या जादूच्या संशयावरून मृत व्यक्तीवर शेजाऱ्यांनी अॅसिड हल्ला केला होता. याप्रकरणी पोलिसांनी मु्ख्य आरोपीला अटक केली असून त्याचा साथीदार फरार झालाय. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीरंग शेजुल (वय, ८५) असे अॅसिड हल्ल्यात मृत्यू झालेल्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, १ सप्टेंबर रोजी गावातील रहिवासी नंदू शेजल आणि भास्कर साबळे यांनी १ सप्टेंबर रोजी काळ्या जादूच्या संशयावरून श्रीरंग शेजुल यांच्यावर अॅसिड हल्ला केला. या हल्ल्यात श्रीरंग शेजुल गंभीर जखमी झाले. त्यांना त्वरीत जाफ्राबाद ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर श्रीरंग शेजुल यांना छत्रपती संभाजी नगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, १७ दिवसांनी म्हणजेच १८ सप्टेंबर रोजी उपचारदरम्यान मृत्यू झाला.
मृताच्या मुलाने स्थानिक पोलिसांत दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, मयत श्रीरंग शेजुल १ सप्टेंबर रोजी त्यांच्या घराच्या व्हरांड्यात झोपले होते. परंतु, रात्री अचानक त्यांच्या वेदनादायक किंकाळ्या ऐकू आल्याने आम्ही सगळे बाहेर आलो. त्यावेळी त्यांच्यावर अॅसिड हल्ल्या झाल्याचे समजले. त्यांना त्वरीत जाफ्राबाद ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, त्यांची प्रकृती खालवत असल्याने त्यांना छत्रपती संभाजी नगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात हलवले गेले.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या तीन महिन्यांपूर्वी नंदू शेजूळ आणि साबळे यांनी मयतावर काळी जादू केल्याचा आरोप केला होता. यावरून मयत आणि आरोपी यांच्यात वाद झाला होता. काळी जादूचा प्रकार न थांबवल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी आरोपींनी मयताला दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी नंदू शेजूळला अटक केली आहे. या घटनेतील दुसरा आरोपी भास्कर साबळे अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.