मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shiv Sena : शिवसेनेचा बुलंद आवाज दक्षिणेत घुमणार, विधानसभेच्या निवडणुकीद्वारे सीएम शिंदे करणार पक्षाचा विस्तार

Shiv Sena : शिवसेनेचा बुलंद आवाज दक्षिणेत घुमणार, विधानसभेच्या निवडणुकीद्वारे सीएम शिंदे करणार पक्षाचा विस्तार

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 23, 2023 08:39 AM IST

Telangana Assembly Elections : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने तेलंगणातील विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

Shiv Sena In Telangana Assembly Elections
Shiv Sena In Telangana Assembly Elections (PTI)

Shiv Sena In Telangana Assembly Elections : महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर सत्तेत आलेल्या शिंदे गटाला निवडणूक आयोगाने शिवसेनेचं नाव आणि चिन्हं बहाल केलं आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा महाराष्ट्राबाहेर विस्तार करायला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यात शिवसेनेची उत्तर प्रदेश राज्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आता शिवसेना पक्ष तेलंगणातील विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे. तेलंगणातील ११९ जागांवर शिवसेनेच्या वतीनं निवडणुकीत उमेदवार उभे केले जाणार आहे, त्यामुळं आता सत्ताधारी भारत राष्ट्र समिती आणि मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

तेलंगणातील शिवसेनेचे प्रदेशाध्यक्ष सिंकरू शिवाजी यांनी शिवसेना तेलंगणा विधानसभेची निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. याशिवाय तेलंगणात शिवसेनेच्या वतीने ३३ टक्के उमेदवारी महिला आणि शहीद जवानांच्या कुटुंबियांना देण्यात येणार असल्याचंही सिंकरू यांनी सांगितलं आहे. तसेच तेलंगणात राज्य निर्मितीसाठी लढणारे नेते आणि बेरोजगार तरुणांनाही शिवसेना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहे. तसेच अनुसूचित जाती व जमाती, अल्पसंख्यांक आणि पत्रकारांनाही तिकीट देण्यात असल्याचं सिंकरू यांनी म्हटलं आहे. निवडणुकीपूर्वी दलित तसेच मागासवर्गांच्या प्रश्नांवर शिवसेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्याचे संकेत त्यांनी दिले. यावेळी शिवसेना प्रदेशाध्यक्ष सिंकरू शिवाजी यांच्यासह गोपी किशन आणि श्रीनिवास रेड्डी उपस्थित होते.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे गेल्या काही दिवसांपासून 'मिशन महाराष्ट्रा'वर आहेत. नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात केसीआर यांनी जाहीर सभा घेत महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. तसेच शिवसेना, राष्ट्रवादी आणि शेतकरी नेत्यांना मुख्यमंत्री केसीआर यांनी भारत राष्ट्र समितीत प्रवेश दिला आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने तेलंगणा विधानसभेची निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्यामुळं दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष होण्याची चिन्हं आहेत.

IPL_Entry_Point