आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपावरून महायुतीमध्ये जोरदार संघर्ष होत असतानाच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अनेक फाइल्स मुख्यमंत्री कार्यालयामध्ये सही विना अडकून पडल्याची माहिती समोर आली होती. आता याचे पडसाद मंत्रिमंडळ बैठकीत दिसून येत आहेत. राज्य सरकारमधील तिन्ही पक्षांमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर येताना दिसत आहे. फाईल वाचल्याशिवाय मी सही करणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) व उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी घेतल्याने मंत्रिमंडळ बैठकीत तणावाचं वातावरण पाहायला मिळालं.
अजित पवार गटातील अनेक मंत्र्यांच्या विभागांचेनिर्णय तसेच आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांच्या अनेक फाईल्स मुख्यमंत्री कार्यालयात अडकल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार प्रमाणेच महायुतीमध्येही वादाची ठिणगी पडताना पाहायला मिळत आहे. त्यातच आज आयोजनत मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्यात फाईलींवर सही करण्यावरून मोठा वाद झाल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या नगरविकास खात्याची फाईल पूर्णपणे वाचल्याशिवाय मी सही करणार नाही, अशी ठाम भूमिका अजित पवारांनी घेतली. त्यावर तुमच्याकडून आलेल्या फाईलींवर मी सुद्धा सही करणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले बैठकीत शांतता पसरली. मात्र हा विषय संपल्यानंतर बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
राष्ट्रवादी मंत्र्यांच्या व आमदारांच्या फाईलींची मुख्यमंत्री कार्यालयाकडून अडवणूक होत असल्याचे समोर आल्यानंतर अजित पवारांनीही नगरविकास खात्याची फाईल संपूर्ण वाचल्याशिवाय सही करणार नसल्याची भूमिका घेतल्याने महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचे समोर आले आहे.
फाईलींवर सह्या करण्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार यांच्यात खडाजंगी झाल्याची माहिती आहे. अजित पवार यांनी सही करणार नसल्याचे म्हणताच तुमच्याकडून आलेल्या फाईलींवर मी सुद्धा सही करणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतल्याने सर्व मंत्रिमंडळ अवाक् झाले.
अजित पवार म्हणाले की, सही करण्यापूर्वी वाचायला वेळ मिळायला पाहिजे.आयत्यावेळी विषय आले तर कसं करायचं.त्यावर तुमच्याकडून आलेल्या फाईलवरती मी सह्या करत नाही का, अशी मखलाशी मुख्यमंत्र्यांनी जोडली.
शिंदे-पवार यांच्यात सहीवरून कलगीतुलरा रंगला असतानाच या वादात शिवसेनेचा मंत्रीही उतरला. त्याने अजित पवारांवर मोठा आरोप केला. माझ्या विभागाची फाईल का अडवून ठेवली आहे. त्यावर तुम्ही निर्णय का घेत नाही, असा सवाल करत या मंत्र्याने अजित पवारांना लक्ष्य केलं. यामध्ये आमचं काही हितसंबंध नसून लोकांच्या हिताची कामं असल्याचं हा मंत्री म्हणाला. एकूणच आजच्या बैठकीत महायुतीतील विसंवाद समोर आला.