Buldana News: सध्या तलवारीने केक कापून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी पोलीस कठोर पावले उचलत असताना बुलढाण्यात शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी तलवारीने केक कापून सहकाऱ्यांना भरविल्याचा व्हिडिओ समोर आला. याप्रकरणी संजय गायकवाड यांच्यासह तीन जणांविरोधात बुलढाणा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय गायकवाड यांचा चिरंजीव मृत्युंजय गायकवाड याचा दोन दिवसांपूर्वी वाढदिवस होता. मृत्युंजयच्या वाढदिवसानिमित्त बुलढाण्यात कार्यक्रम ठेवण्यात आला. या कार्यक्रमात संजय गायकवाड यांनी हजारो नागरिकांसमोर तलवारीने केक कापून मुलाचा वाढदिवस साजरा केला. एवढेच नव्हेतर त्यांनी आपली पत्नी आणि इतर सहकाऱ्यांना देखील तलवारीने केक भरवला. यानंतर सार्वजनिक ठिकाणी शस्त्र प्रदर्शन केल्याप्रकरणी संजय गायकवाड यांच्याविरोधात मुंबई पोलीस कायदा १३५ अन्वये कलम ३७ (१) (३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले, ज्यात संजय गायकवाड भल्या मोठ्या स्टेजवर आपल्या मुलाच्या वाढदिवसाचा केक कापताना दिसत आहेत. परंतु, तलवारीने केक कापणे हा आर्म ॲक्टनुसार गुन्हा आहे. त्यामुळे आमदार संजय गायकवाड यांच्यावर बुलढाणा पोलीस नेमकी काय कारवाई करतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
संजय गायकवाड वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी त्यांनी ८० च्या दशकात वाघाची शिकार करून त्याचे दात गळ्यात घातल्याचा दावा केला होता. त्यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्राणीप्रेमींनी त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली. शिवजयंतीनिमित्त एका कार्यक्रमात संजय गायकवाड वेगळ्या वेशभूषेत दिसले. त्यावेळी त्यांच्या गळ्यात जपमाळ होती. याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की, हा वाघाचा दात आहे, मी १९८७ मध्ये वाघाची शिकार करून त्याचे दात काढले होते.