मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Shinde : उद्धव ठाकरेंनी तोडली बंधनं, आमदारांना केलं बंधमुक्त

Eknath Shinde : उद्धव ठाकरेंनी तोडली बंधनं, आमदारांना केलं बंधमुक्त

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Jun 23, 2022 12:14 PM IST

आपल्या आमदारांवर (MLA) आपला अंकुश राहिला नसल्याचं लक्षात आल्यावर शिवसेनेनं(Shiv Sena) आता ही बंधनं तोडण्याचा निर्णय घेतला आहे.

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे (हिंदुस्तान टाइम्स)

Eknath Shinde Update : शिवसेनेसमोर (Shiv Sena) आता एक नवी डोकेदुखी वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आता शिवसेनेनं ज्या आमदारांना (MLA) हॉटेलमध्ये ठेवलं होतं त्यातले काही आमदार काही ना काही बहाणा करुन थेट एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) गटात सहभागी होण्यासाठी थेट गुवाहाटी (Guwahati) गाठत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळेच आता आपल्या उरलेल्या आमदारांना बंधमुक्त करण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. ज्यांना आपल्या मतदारसंघात जायचं असेल त्यांनी खुशाल आपल्या मतदारसंघात जावं असं फर्मान शिवसेनेनं काढलं आहे.

शिवसेनेनं आणखी आमदार फुटू नयेत म्हणून उर्वरीत आमदारांना एका हॉटेलमध्ये ठेवलं आहे. मात्र त्यातल्याच काही आमदारांनी काहीना काही कारण काढून हॉटेलमधून बाहेर पडणं पसंत केलं होतं मात्र त्यानंतर तेच आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन भेटत असल्याचं चित्र शिवसेनेला पाहावं लागत आहे.जळगावचे गुलाबराव पाटील यांनी आजारी असल्याचा बहाणा करत जळगाव गाठलं होतं. मात्र तिथून ते थेट एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले असल्याचं पाहायला मिळालं होतं. त्याचप्रमाणे सदा सरवणकर,दीपक केसरकर, मंगेश कुडाळकर हे आमदारही काहीतरी कारणं देत हॉटेलमधून निघाले होते आणि त्यांनी शिंदे गटात सहभाग नोंदवला होता. त्यामुळेच आता आपल्या आमदारांवर आपला अंकुश राहिला नसल्याचं लक्षात आल्यावर शिवसेनेनं आता ही बंधनं तोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

आता ज्या आमदारांना आपल्या मतदारसंघात जायचं असेल त्यांनी खुशाल जावं अशी सूचना आता शिवसेनेनं आपल्या आमदारांना केल्याचं समजतं आहे. 

शिवसेनेकडे असलेल्या एकूण ५५ आमदारांपैकी आता जवळपास ४१ आमदार एकनाथ शिंदे यांना गुवाहाटी इथं जाऊन सहभागी झाले असल्याचं वृत्त आहे. 

सोमवारी संध्याकाळी एकनाथ शिंदे आपल्या काही समर्थक आमदारांसह अचानक नॉट रिचेबल झाले होते. त्यानंतर राज्याच्या राजकारणात भूकंप पाहायला मिळाला होता. त्यानंतर राज्यातल्या शिवसेनेच्या आमदारांना एकनाथ शिंदे यांनी एकएक करुन आपल्या गळाला लावलं होतं. सर्वसामान्य लोकांच्या हाकेला धावून जाणारा नेता अशी एकनाथ शिंदे यांची ओळख असल्याचं या आमदारांचं म्हणणं आहे. आता राज्याची ही फूट नेमकी कुठे जाऊन थांबते हे पाहावं लागेल. 

IPL_Entry_Point