मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  'शिवसेना सोडली नाही, सोडणारही नाही पण…', पहिल्यांदाच बोलले एकनाथ शिंदे

'शिवसेना सोडली नाही, सोडणारही नाही पण…', पहिल्यांदाच बोलले एकनाथ शिंदे

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Jun 22, 2022 07:31 AM IST

सुरतमधून आसामच्या गुवाहाटीत आमदारांसह पोहचलेल्या एकनाथ शिंदे यांनी आता आपल्यासोबत ३५ नव्हे तर ४० आमदार असल्याचा दावा केला आहे.

एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे (फोटो - एएनआय)

शिवसेनेचे (Shivsena) नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड करत विधान परिषद निवडणुकीनंतर थेट सुरत गाठली. त्यानंतर राज्यात राजकीय भूकंप होणार अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आता आपल्याला ३५ नव्हे तर ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे. सुरतमधून मध्यरात्री एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांसह गुवाहाटीला (Guwahati) गेले आहेत. त्यावेळी पहिल्यांदाच माध्यमांसमोर बोलातना एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की,"हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बाळासाहेबांनी दिलेली शिकवण आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या शिकवणीनुसार कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेच्या आमदारांनी फारकत घेतली नाही."

एकनाथ शिंदे हे गुवाहाटी विमानतळावर पोहोचले असून तिथे त्यांच्या स्वागतासाठी भाजप आमदार सुशांता बोर्गोहेन हे आले होते. आमदार सुशांता यांनी म्हटलं की, मी त्यांना घेण्यासाठी आलो आहे. त्यांचे आमदार किती आहेत हे मोजण्यासाठी नाही. वैयक्तिक संबंध असल्यानं इथं आल्याचंही भाजप आमदार सुशांता म्हणाले.

गुवाहाटीत विमानतळावर पोहोचल्यानंतर एकनाथ शिंदेंनी आपण शिवसेना सोडली नसल्यांच सांगताना म्हटलं की, "सत्तेसाठी किंवा राजकारणासाठी असो बाळासाहेबांचं कडवट हिंदुत्व ही भूमिका आम्ही पुढे घेऊन जात आहोत. आम्ही शिवसेना सोडली नाही, सोडणार नाही. पण बाळासाहेबांचे जे विचार आणि भूमिका आहे ते घेऊन आम्ही पुढचं राजकारण, समाजकारण करणार."

...तर सरकार अल्पमतात
एकनाथ शिंदे यांनी दावा केल्याप्रमाणे जर त्यांच्यासोबत ४० आमदार असतील तर गट स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेली ३७ ही संख्या त्यांनी गाठली असल्याचं दिसतंय. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांचा फोटोही समोर आला आहे. आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांचे पत्र राजभवनात पाठवले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर सरकार अल्पमतात असल्याचं सांगत विश्वासदर्शक ठराव सिद्ध करण्याचे आदेश राज्यपाल देऊ शकतात असं म्हटलं जातंय. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या ३७ आमदारांच्या गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळाली तर सरकार अल्पमतात जाऊ शकते.

WhatsApp channel

संबंधित बातम्या