Eknath shinde news : राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं. यानंतर आता महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न सर्वांना पडला आहे. एकनाथ शिंदे यांनी मलाच मुख्यमंत्री करा ही मागणी लावून धरली होती. मात्र, अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना जाहीर पाठिंबा दिल्याने आता मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडवा लागला आहे. यामुळे नाराज असलेल्या एकनाथ शिंदे यांनी आता दोन नव्या मागण्या केल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या या नव्या मांगण्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढणार आहे.
महायुतीत सर्वाधिक जागा या भाजपला मिळाल्या आहेत. त्यात काही अपक्ष आणि अजित पवार गटाने मुख्यमंत्री म्हणूने देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री पदावरील दावा कमकुवत झाला आहे. भाजपच्या अनेक आमदारांनी देवेंद्र फडवणीस यांनाच मुख्यमंत्री करावे अशी मागणी केली आहे. भाजपच्या पक्षनेत्यांनी देखील देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असे संकेत दिले आहे. मात्र, फडवणीस यांच्या नावाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. भाजपच्या दबावामुळे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीमधून माघार घेतली आहे. मात्र, शिंदे यांनी केलेल्या मागण्यांमुळे महायुतीसमोर नवा पेच निर्माण होणार आहे.
भाजपकडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद सोडण्याच्या मोबदल्यात केंद्रात महत्त्वाच्या खात्याचे मंत्रीपद किंवा राज्यात उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली होती. मात्र, एकनाथ शिंदे यांनी या दोन्ही ऑफर्स नाकारल्या आहेत. त्याऐवजी एकनाथ शिंदे यांनी एक नवा प्रस्ताव भाजपसमोर ठेवला आहे. सीएनएन-न्यूज १८ च्या वृत्तानुसार काल झालेल्या बैठकीत मुलगा खासदार श्रीकांत शिंदे यांना राज्यात उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावे नाही तर मला गृहमंत्री करण्यात यावे अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या या मागणीने भाजप आणि महायुतीचे नेते गोंधळात पडले आहे.
दरम्यान, श्रीकांत शिंदे यांना महायुतीत उपमुख्यमंत्रिपद देण्यात येणार असल्याची ही चर्चा आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती पुढे आलेली नाही. श्रीकांत शिंदे हे कल्याण मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत. जून-जुलै २०२२ मध्ये शिवसेना फुटल्यावर व महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन करत मुख्यमंत्री बनले होते.
एकनाथ शिंदे यांना केंद्रीय मंत्री म्हणून केंद्रात आणावे, अशी सूचना भाजपचे मित्रपक्ष आरपीआय (ए) नेते रामदास आठवले यांनी मंगळवारी केली होती. मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीस यांना पाठिंबा देताना आठवले म्हणाले की, शिंदे एकतर उपमुख्यमंत्री होऊ शकतात किंवा केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सामील होऊ शकतात.