मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Shinde : आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ का सोडली?, एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं!

Eknath Shinde : आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ का सोडली?, एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं!

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 19, 2023 08:33 PM IST

Eknath Shinde Khed Rally : उद्धव ठाकरेंनी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींना व्यासपीठावरून खाली उतरवलं, नेत्यांना संपवून पक्ष मोठा होत नाही, असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

Eknath Shinde Rally In Khed Ratnagiri
Eknath Shinde Rally In Khed Ratnagiri (HT)

Eknath Shinde Rally In Khed Ratnagiri : कार्यकर्ता मोठा तर पक्ष मोठा, इतरांना संपवून पक्ष मोठा करता येत नाही. मातब्बर नेते उद्धव ठाकरेंना का सोडून जात असावेत?, याचा विचार त्यांनी करायला नको का?, गुलाबराव पाटील, रामदास कदम, राज ठाकरे, गजानन किर्तीकर, गणेश नाईक, नारायण राणे यांच्यासह अनेक नेत्यांना बाजूला सारण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेडमधील सभेतून केला आहे. मी मुख्यमंत्री असलो तरी कार्यकर्ता म्हणून अनेक लोकांचं काम करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. अशोक चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी शेण खाल्ल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता. मग त्यांच्यासोबत सत्तेत जाऊन उद्धव ठाकरेंनी काय खाल्लं?, असा खोचक सवाल मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवारांनी त्यांना डोळा मारला, अनेकांनी पाहिलं. त्यांच्या गळ्यात गळा आज तुम्ही घालताय, पण ते कधी तुमचा गळा दाबतील ते कळणार नाही. मविआचं सरकार स्थापन होत असताना ठाकरेंनी ते मुख्यमंत्री होणार नसल्याचं सांगितलं. परंतु विरोधकांशी माझे चांगले संबंध होते. त्यावेळी काय घडलं होतं, हे मला समजलं होतं, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे वारसदार असले तरी आम्ही त्यांचे वैचारिक वासरदार आहोत. आम्हाला तुमची संपत्ती नको आहे. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे. आम्ही शिवसेनेच्या संपत्तीवर कोणताही अधिकार सांगणार नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंनी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींना व्यासपीठावरून खाली उतरवलं. इतर नेत्यांना राजकारणातून संपवण्याचं काम केलं. आता तर ते थेट कार्यकर्त्यांना संपवण्यासाठी निघाले आहेत. कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना संपवून पक्ष मोठा होत नाही. आम्ही नेते, कार्यकर्ते आणि बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे जात आहोत, कुणी मोठं होत असलं तर आमच्या पोटात दुखत नाही, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. अनेक लोकं भेटण्यासाठी यायची, त्यांना तुम्ही एक कप चहा पाजू शकत नाही. त्याचाही तुम्ही हिशोब काढता?, अडीच वर्ष तुम्ही घरातूनच काम केलं. आता मात्र मुख्यमंत्र्यांचा बंगला सर्वांसाठीच खुला आहे. मला पदाचा मोह नसल्यानं सर्वांसाठीच आमचं सरकार काम करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

IPL_Entry_Point