‘अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांसोबत बसणं मला सहन होत नाही. त्यांच्या सोबत बसल्यानंतर मला ओकारी येते,’ असं खळबळ उडवून देणारं विधान एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांनी केलं आहे. या विधानामुळं महायुतीमध्ये मोठा राडा होण्याची शक्यता आहे. तर, विरोधकांना आयतीच संधी मिळाली आहे.
तानाजी सावंत यांनी एका जाहीर कार्यक्रमात हे वक्तव्य केल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. मी कट्टर शिवसैनिक आहे. मी माझ्या आयुष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ कधीच केली नाही. विद्यार्थी असल्यापासून माझं त्यांच्याशी जमलं नाही. हे वस्तुस्थिती आहे. आज मी त्यांच्यासोबत (अजित पवार राष्ट्रवादी) मंत्रिमंडळात बसलो तरी बाहेर आल्यावर उलट्या होतात. मी ते सहन करू शकत नाही,' असं सावंत यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी यावर काहीशी सौम्य प्रतिक्रिया दिली आहे. ‘तानाजी सावंत यांना उलट्या कशामुळं होतात माहीत नाही. ते आरोग्य मंत्री आहेत, त्यांच्या आरोग्याचा उलट्यांशी काहीतरी संबंध असेल. पण महायुतीत असल्यानं त्यांना ओकाऱ्या वगैरे होत असतील तर तसं कशामुळं होतंय हे एकनाथ शिंदेच सांगू शकतील,’ असं मिटकरी म्हणाले.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं ही संधी साधत अजित पवारांसह भाजप व महायुतीवर निशाणा साधला आहे. 'अजितदादांसारखा एक नेता अशा प्रकारचा अपमान कसा काय सहन करू शकतो हेच कळत नाही. सत्तेसाठी एवढी लालसा अजितदादांच्या मनात असेल असं वाटलं नव्हतं. त्यांच्यातला स्वाभिमानी बाणा कुठे हरपला याचा शोध त्यांच्या पक्षातल्या लोकांनी घेण्याची गरज आहे, असा टोला महेश तपासे यांनी लगावला.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीची झालेली पीछेहाट याला सर्वस्वी जबाबदार अजित पवार आहेत असा सूर आरएसएस व भाजपने खुलेआम उपस्थित करून अजित पवारांना जबाबदार ठरविले. त्यातच शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांची अजितदादा विषयी भूमिका व त्यांना सरकारमध्ये सामील केल्याबाबतची नाराजी ही आता उघड उघड समोर येऊ लागलेली आहे, याकडंही तपासे यांनी लक्ष वेधलं.
सावंत यांच्या वक्तव्यावरून यापूर्वीही वाद निर्माण झाले आहेत. गेल्या वर्षी सावंत यांनी धाराशीव जिल्ह्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला सुनावलं होतं. मी मुख्यमंत्र्यांचंही ऐकत नाही, त्यामुळं अधिकाऱ्याला मी सांगतो तसंच करावं लागेल, असं म्हणाले होते. तर, 'महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी शिवसेनेच्या आमदारांच्या एका गटाला पटवून देण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्यानं १०० ते १५० बैठका झाल्या होत्या, असा गौप्यस्फोट त्यांनी केला होता.