Eknath Shinde Viral Video : ‘लिमिटच्या बाहेर गेला की मी कार्यक्रम करतोच…' असं बोलतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना उद्देशून एकनाथ शिंदे यांनी हे उद्गार काढल्याचा अंदाज लावला जात असल्यानं नवा वाद निर्माण झाला आहे.
विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सुरुवात झाली. यावेळी विधानभवनाच्या आवारात मुख्यमंत्री शिंदे व काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी भेट झाली. दोघांमध्ये काही चर्चा झाली. त्यावेळी शिंदे व पटोले यांच्यात झालेलं संभाषण सध्या व्हायरल होत आहे.
या संभाषणावेळी शिंदे पटोलेंना म्हणतात, 'लिमिटच्या बाहेर गेला की मी कार्यक्रम करतोच. त्यावर, तुम्हीच तर मोठा केला ना त्याला? असं म्हणतात. त्यावर सामाजिक कार्यकर्ता होता तोपर्यंत ठीक होतं, असं म्हणून शिंदे निघून जातात. शिंदे यांचे हे उद्गार जरांगे पाटील यांनाच उद्देशून असल्याचं बोललं जात आहे.
महाराष्ट्र काँग्रेसनं आपल्या 'एक्स' अकाऊंटवर या संभाषणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. ‘कार्यक्रम म्हणजे काय समजायचं साहेब? मुख्यमंत्री साहेब! ही धमकी आहे का? उद्या जर जरांगे पाटलांचा जीव गेला तर मुख्यमंत्री जबाबदार असणार का?,’ असे प्रश्न काँग्रेसनं उपस्थित केले आहेत. तर, नेटकऱ्यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या तोंडी ही भाषा शोभत नाही असं लोकांनी म्हटलं आहे. 'मतं मागायला यावं लागेल, असंही काही लोकांनी म्हटलं आहे.
मराठा समाजाला कुणबी समजून ओबीसीमधून आरक्षण द्यावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन उभारलं आहे. त्यासाठी काही दिवसांपूर्वी मुंबईच्या दिशेनं एक मोर्चाही काढण्यात आला होता. मुंबईत येण्याआधीच सरकारनं मराठा समाजाच्या मागण्या मान्य करणारी अधिसूचना काढली. खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांनी लोकांसमोर जाऊन मराठा समाजाला आरक्षण दिल्याचं जाहीर केलं. मात्र, प्रत्यक्षात ओबीसीमधून आरक्षण न देता स्वतंत्र १० टक्के आरक्षणाचं विधेयक मंजूर केलं. हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकण्याची शक्यता नसल्यामुळं सरकारनं मराठा समाजाची फसवणूक केल्याची भावना लोकांमध्ये आहे. त्यामुळंच जरांगे पुन्हा एकदा आंदोलन करत आहेत.