मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Aurangabad Name Change : शहरांनंतर आता जिल्ह्यांचं नामांतर, औरंगाबाद, उस्मानाबादच्या नव्या नावांचं राजपत्र जारी

Aurangabad Name Change : शहरांनंतर आता जिल्ह्यांचं नामांतर, औरंगाबाद, उस्मानाबादच्या नव्या नावांचं राजपत्र जारी

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 16, 2023 09:34 AM IST

Aurangabad Name Change : राज्यातील दोन शहरांच्या नामांतराला केंद्रीय गृहमंत्रालयाने परवानगी दिली होती. त्यानंतर राज्य शासनाकडून नामांतराची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Aurangabad and Osmanabad Name Change
Aurangabad and Osmanabad Name Change (HT)

Aurangabad and Osmanabad Name Change : औरंगाबाद आणि धाराशीव या शहरांचं नामांतर करण्यात आल्यानंतर आता दोन्ही जिल्ह्यांचं नामांतर करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. औरंगाबाद जिल्ह्याचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलं आहे. तर उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव बदलून धाराशीव असं करण्यात आलं आहे. याबाबतचा आदेश महसूल व वन खात्याकडून जारी करण्यात आला आहे. नामांतराचा तिढा मुंबई हायकोर्टात पोहचला आहे. कोर्टात सुनावणी सुरू असताना प्रशासकीय प्रक्रिया पार पडेपर्यंत नामांतर केलं जाणार नसल्याची ग्वाही राज्य सरकारने दिली होती. परंतु आता शहरांसहित जिल्ह्यांचं नामांतर करण्यात आलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

औरंगाबाद आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांचं नामांतर करण्याबाबत राज्य सरकारने राजपत्र जारी केलं असून त्यात स्पष्टपणे जिल्ह्यांचं नाव बदलण्यात येत असल्याचं सांगण्यात आलं आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू असताना राज्य सरकारने तूर्तास नामांतर न करण्याची भूमिका घेतली होती. आक्षेपांची पडताळणी आणि प्रशासकीय प्रक्रिया पार पडेपर्यंत औरंगाबाद आणि उस्मानाबाद हीच नावं वापरली जातील, असं राज्य सरकारकडून कोर्टात स्पष्ट करण्यात आलं होतं. परंतु त्यानंतर आता राज्य सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

नामांतराची प्रक्रिया कशी असते?

कोणत्याही शहराचं किंवा जिल्ह्याचं नामांतर करण्यासाठी तेथील महापालिकेचा ठराव राज्य सरकारकडे येणं आवश्यक असतं. त्यानंतर राज्य सरकारकडून विधानसभेत प्रस्ताव पास केला जातो. राज्यातील दोन्ही शहरांच्या नामांतरावेळी या प्रक्रियेचं पालन करण्यात आलेलं आहे. राज्य सरकार मंजूर केलेला प्रस्ताव परवानगीसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवते. केंद्राची परवानगी मिळताच शहरांची तसेच जिल्ह्यांची नावं बदलण्याची प्रक्रिया सुरू होत असते.

WhatsApp channel