मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शिंदेंची दिल्लीवारी आणि संजय राऊतांच्या अटकेचा संबंध काय? केसरकर म्हणाले…

शिंदेंची दिल्लीवारी आणि संजय राऊतांच्या अटकेचा संबंध काय? केसरकर म्हणाले…

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Aug 01, 2022 02:08 PM IST

Eknath Shinde Behind Sanjay Raut Arrest?: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर झालेल्या अटकेच्या कारवाईमागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याचं बोललं जात आहे.

Deepak Kesarkar - Sanjay Raut
Deepak Kesarkar - Sanjay Raut

Eknath Shinde Behind Sanjay Raut Arrest: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अटकेनंतर उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. राऊत यांच्या घरात सापडलेल्या रोकड रकमेवर 'एकनाथ शिंदे अयोध्या' असा उल्लेख आहे. तसंच शिंदे यांच्या अचानक झालेल्या दिल्ली दौऱ्याशीही राऊत यांच्या अटकेचा संबंध जोडला जात आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी यावर सविस्तर खुलासा केला आहे.

ते पत्रकारांशी बोलत होते. 'मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवारीशी संजय राऊत यांच्या अटकेचा संबंध नाही. तसा संबंध जोडणं चुकीचं आहे. संजय राऊत यांची कारवाई तपास यंत्रणांना मिळालेल्या काही पुराव्यांच्या आधारे होत आहे. आता हे प्रकरण न्यायालयात आहे. आपली बाजू मांडून ते यातून सुटू शकतात. त्यांना ते जमलं नाही तर त्यांना कोठडी मिळू शकते. मात्र, त्यांच्या विरोधात कारवाई व्हावी अशी मागणी आम्ही कधीच केलेली नाही. अशा कारवाया अनेक मोठ्या व्यक्तींच्या विरोधात होत आहेत. त्यात मोठे व्यापारी व बांधकाम व्यावसायिक आहेत. फक्त राजकीय नेत्यांविरोधातच होत आहेत असं नाही. त्यामुळं आकसबुद्धीनं काही होत आहे असं म्हणता येणार नाही, असं केसरकर म्हणाले.

'संजय राऊत यांच्या अटकेमुळं आम्हाला अजिबात आनंद झालेला नाही. या संदर्भात आमच्या आमदारांनी दिलेल्या प्रतिक्रिया वैयक्तिक त्रासातून दिलेल्या आहेत, असंही केसरकर म्हणाले.

संजय राऊत यांनी शिवसेना सोडावी म्हणून त्यांच्यावर ही कारवाई केली जात असल्याच्या आरोपांत तथ्य नसल्याचं केसरकर म्हणाले. 'संजय राऊत यांनी शिवसेना सोडण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना कुठला पक्ष प्रवेश देईल असं वाटत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय दुसरा कुठलाही पक्ष त्यांना घेणार नाही, असं केसरकर म्हणाले.

WhatsApp channel