Devendra Fadnavis phone called Eknath Shinde: राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या दोन दिवसांपासून सातारा जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी उपचार घेत आहेत. त्यांचे फॅमिली डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. डॉक्टरांनच्या पथकाने पत्रकार परिषद घेत त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली. एकनाथ शिंदे यांना ताप व घशाच्या संसर्ग झाला असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. एकनाथ शिंदे हे आज त्यांच्या गावरून ठाण्यासाठी रवाना होणार आहेत, अशीही माहिती समोर येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. रविवारी सायंकाळी ते साताऱ्याहून मुंबईला परतणार आहेत. शिंदे यांना साताऱ्यातील त्यांच्या मूळ गावी दरे येथे गेल्यावर ताप आला होता. शनिवारी डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्यावर उपचार केले. त्यांना औषधे देण्यात आली आहेत, अशी माहिती डॉ. पार्टे यांनी दिली. शिंदे यांना सध्या बरे वाटत असून आज रविवारी संध्याकाळी ते मुंबईला रवाना होतील.
एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समजताच देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांनाफोन केला. एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीची विचारपूस देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून केली. प्रकृती ठीक नसल्यानं एकनाथ शिंदे यांनी शनिवारचे त्यांचे नियोजित कार्यक्रमही रद्द केले होते. शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांची भेटही त्यांनी घेतली नव्हती.
राज्यात सध्या मुख्यमंत्रीपदावरून चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे. यामुळे ते त्यांच्या सताऱ्यातील गावी गेल्याचे बोललं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेतृत्वाच्या निर्णयाचे पालन करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले होते. या वक्तव्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुती सरकारचा शपथविधी सोहळा ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता आझाद मैदानात होणार असल्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारपर्यंत मोठा राजकीय निर्णय घेऊ शकतात, अशी माहिती शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी दिली. शिंदे साहेब जेव्हा मोठे निर्णय घेतात तेव्हा ते आपल्या गावी जाऊन वेळ काढतात. उद्या सायंकाळपर्यंत परिस्थिती स्पष्ट होईल, असे मला वाटते, असे शिरसाठ म्हणाले.
संबंधित बातम्या