मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Cabinet Expansion: सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार

Cabinet Expansion: सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार

Haaris Rahim Shaikh HT Marathi
May 11, 2023 08:27 PM IST

Maharashtra Cabinet Expansion: सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निर्णयानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.

Maharashtra CM Eknath Shinde with Dy CM Devendra Fadnavis
Maharashtra CM Eknath Shinde with Dy CM Devendra Fadnavis (PTI)

आजच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज्यात एकनाथ शिंदे सरकारला जीवदान मिळाले असून आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं वृत्त आहे. मंत्रिमंडळ विस्तारात एकूण १९ नवे मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. काही मंत्र्यांच्या खात्यांमध्येही फेरबदल होण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे.

शिंदे, फडणवीस सरकार ३० जून २०२२ रोजी अस्तित्वात आल्यापासून दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. सुप्रीम कोर्टात प्रकरण प्रलंबित असल्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळत नव्हता. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याचे बोलले जात होते. नवीन मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातील काही ज्येष्ठ, अनुभवी आमदार आणि भाजपमधील काही आमदारांना मंत्रीपदाची संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सरकार स्थापन झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर तब्बल एका महिन्यानंतर म्हणजे ९ ऑगस्ट २०२२ रोजी पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला होता. त्यावेळी मंत्रिमंडळात एकूण १८ आमदारांना मंत्रिपद मिळाले होते. त्यात भाजपचे ९ आणि शिंदे गटाचे ९ आमदार मंत्री झाले होते. राज्यात कॅबिनेटमध्ये अद्यापही २० ते २२ मंत्रिपदं शिल्लक आहेत.

दरम्यान, राज्यात अद्याप अनेक ठिकाणी एकच मंत्री दोन किंवा दोन पेक्षा जास्त जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहत आहेत. त्यामुळे त्या जिल्ह्याकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका विरोधकांकडून केली जाते. या पार्श्वभूमीवर आज आलेल्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचं बोललं जात आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या