Eknath Shinde : महायुतीला राज्यात फटका कशामुळे बसला? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'मतदार सुट्टीवर..'
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Shinde : महायुतीला राज्यात फटका कशामुळे बसला? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'मतदार सुट्टीवर..'

Eknath Shinde : महायुतीला राज्यात फटका कशामुळे बसला? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'मतदार सुट्टीवर..'

Jul 06, 2024 11:45 PM IST

Eknath Shinde : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील भाजपच्या जागांची संख्या नऊवर आली आहे. शिंदे यांच्या शिवसेनेला केवळ सात जागा मिळू शकल्या, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एक जागा मिळाली. याचे कारण एकनाथ शिंदे यांनी शोधले आहे.

महायुतीच्या संयुक्त मेळाव्यात मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री
महायुतीच्या संयुक्त मेळाव्यात मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री (PTI)

लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक निष्ठावंत मतदार मतदानादरम्यान सुट्टीवर गेले होते, त्यामुळे महायुतीला राज्यात मोठा फटका बसल्याचा तर्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लावला आहे. शिंदे म्हणाले की, लोकसभेच्या ५४३ सदस्यांच्या कनिष्ठ सभागृहात भाजपला ४०० हून अधिक जागा मिळतील, असे मतदारांनी गृहीत धरले होते, त्यामुळे ते मतदानालाच गेले नाहीत.

मुंबईत सत्ताधारी महायुतीच्या मित्रपक्षांच्या संयुक्त मेळाव्यात संबोधित करताना शिंदे म्हणाले, 'लोकसभा निवडणुकीच्या वेळी ४०० जागांवरून विरोधकांनी आम्हाला कोंडीत पकडले होते. सार्वत्रिक निवडणुकीत एनडीएला ४०० पेक्षा जास्त जागा सहज मिळतील, असे गृहित धरून आमचे काही मतदार मतदानादरम्यान सुट्टीवर गेले होते. हा तोटा भविष्यात अधिक धोरणात्मक दृष्टिकोनाची गरज अधोरेखित करतो. 

मुख्यमंत्री म्हणाले की, विरोधी मतदारांनी मोठ्य तत्परतेने मतदानाचा हक्क बजावला. विरोधी मतदारांचा टक्का जवळपास ८० टक्के होता, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. आपले लोक तीन दिवस सुट्ट्या घेऊन गेले, येणार तर मोदीच यावर लोक गाफील राहिले.फसवणूक एकदाच होते, नेहमीनेहमी नाही, असंही शिंदे यांनी सांगितले. जर आमचे ६० टक्के मतदार मतदान केंद्रांवर आले असते तर आम्ही ४० जागा सहज जिंकू शकलो असतो. लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्यानंतर आम्ही सतर्क झालो आहोत, असेही ते म्हणाले.

भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांच्या दाव्याचे समर्थन करताना म्हटले की, एनडीएच्या नेत्यांनी प्रचारादरम्यान विरोधकांनी पसरवलेल्या खोटारडेपणाकडे पुरेसे लक्ष दिले नाही.  नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ) यांच्या महाविकास आघाडीला ३० जागा मिळाल्या.  दुसरीकडे भाजपच्या जागांची संख्या नऊवर आली, शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मित्रपक्ष शिवसेनेला सात, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला केवळ एक जागा मिळवता आली. 

एकनाथ शिंदे म्हणाले, दोन वर्षापूर्वी राज्याने मोठा उठाव पाहिला. मतदारांसोबत झालेल्या विश्वास घाताबाबत तो उठाव होता. देवेंद्र फडणवीस यांची मला भक्कम साथ लाभली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी मला भरपूर प्रेम दिले. मोदी आणि अमित शाह पाठीशी उभे राहिले. आपले सरकार यायच्या आधी सर्व कामे ठप्प होती. मात्र आता चित्र बदलले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर