Eknath shinde awarded mahadji shinde rashtriya Gaurav award : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीमध्ये ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमानिमित्त शरद पवार व एकनाथ शिंदे एकाचा मंचावर आले होते. या कार्यक्रमादरम्यान एकनाथ शिंदेंनी जबरदस्त भाषण करत शरद पवारांवर स्तुतीसुमने उधळली. यावेळी त्यांनी शरद पवारांच्या राजकारणातील गुगलीबद्दल विधान केले. यावेळी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेही उपस्थित होते.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा दिल्लीत होत आहे. त्या निमित्ताने सरहद संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सन्माननीय व्यक्तींचा गौरव करण्यात आला. यावेळी महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन एकनाथ शिंदे यांचा गौरव करण्यात आला. पाच लाख रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि शिंदेशाही पगडी असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले की, राजकारणात वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला शिकायला मिळतं. वेगवेगळी विचारधारा असली तरी वैयक्तिक संबंध कसे जपायचे. राजकारणात नातं कसे जपायचं हे पवार साहेबांकडून शिकण्यासारखं आहे. मला हा पुरस्कार ज्यांच्या नावे दिला जात आहे, ते आहेत महापराक्रमी महादजी शिंदे आणि मी आहे कार्यकर्ता एकनाथ शिंदे. येथे पुरस्कार देताना उपस्थित आहेत ज्योतिरादित्य शिंदे. ज्यांनी मला हा पुरस्कार दिला त्यांचं आडनाव पवार असलं तरीसुद्धा ते देशाचे थोर क्रिकेटपटू सदाशिव शिंदे यांचे ते जावई आहेत.
सदाशिव शिंदे हे क्रिकेटमध्ये गुगली टाकायचे. त्यांची गुगली भल्याभल्यांना कळत नसे आणि कधी क्लीन बोल्ड झाले फलंदाजांना कळायचे नाही. त्याचपद्धतीने पवार साहेबांनी राजकारणात टाकलेली गुगली अनेकांना कळत नाही. कधी कधी बाजूला बसलेल्या लोकांना किंवा बसवलेल्या लोकांनाही त्यांची गुगली कळत नाही. माझे पवार साहेबांशी प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांनी मला कधीही गुगली टाकली नाही, यापुढेही टाकणार नाहीत हा विश्वास आहे.
शिंदे म्हणाले हा पुरस्कार मी माझ्या मनाच्या कोपऱ्यात ठेवेन. महाराष्ट्राची सेवा मी मनापासून करत राहीन. महादजी शिंदे नसते तर इंग्रज ५० वर्ष आधी आपल्याकडे आले असते. म्हणजे २०० वर्ष आपल्याला इंग्रजांची गुलामगिरी पत्करावी लागली असती. मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी अडीच वर्ष पायाला भिंगरी लावून काम केलं. काश्मीरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा उभारला. या पुतळ्याच्या तलवारीच टोक पाकिस्तानकडे होत तेव्हा मी म्हणालो होतो पाकिस्तान वाकड्या नजरेने आपल्याकडे पाहणार नाही. आज बाळासाहेब आणि आनंद दिघे साहेब असते तर त्यांनी माझ्या पाठीवर कौतुकाची थाप दिली असती, असेही एकनाथ शिंदेंनी म्हटले.
संबंधित बातम्या