Eknath Shinde On Raj Thackeray: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना सोडण्यामागे उद्धव ठाकरे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राज ठाकरेंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. मात्र, जेव्हा जबाबदारी देण्याची वेळ आली तेव्हा उद्धव ठाकरेंची सुप्त इच्छा जागृत झाली. यानंतर उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष बनवण्याचा प्रस्ताव आणला गेला आणि राज ठाकरेंना हटवण्यात आले, असा खुलासा एकनाथ शिंदे यांनी केला.
राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केले. १९९५ च्या निवडणुकीत राज ठाकरे हे सावलीसारखे बाळासाहेबांच्या पाठिशी उभा राहिले. एकीकडे राज ठाकरे आणि दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेचा प्रचार करत होते. त्यानंतरही राज ठाकरेंनी अनेक वर्ष शिवसेनेत काम केले. मात्र, त्यानंतरही राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर का पडले? असा प्रश्न अजूनही उपस्थित केला जातो. यावर एकनाथ शिंदे यांनी सविस्तर चर्चा केली.
एकनाथ शिंदे म्हणाले की, मी नेहमी माझ्या भाषणात सांगतो की,'उद्धव ठाकरे म्हणतात, लाडकी बहीण आणली, लाडका भाऊ कधी आणणार? आम्ही युवा प्रशिक्षणातून लाडका भाऊही आणला. परंतु, राज ठाकरे तुमच्यासोबत होते, तेव्हा त्यांनी पक्ष सोडण्यामागचे कारण काय होते?' असा सवाल एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला. पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की, '१९९५ च्या निवडणुकीत राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या खाद्याला खांदा लावून काम केले. पण जेव्हा राज ठाकरेंना जबाबदारी देण्याची वेळ आली, तेव्हा उद्धव ठाकरेंच्या मनात सुप्त इच्छा जागृत झाली. जशी आता मुख्यमंत्रीपदाची होती. शिवसेनेत राज ठाकरेंना बाजूला करण्यात आले आणि उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष बनवण्याचा प्रस्ताव आणला गेला. पक्षातून हटवल्यानंतरही राज ठाकरेंनी ज्या ठिकाणी शिवसेना कमकुवत आहे, तिथली जबाबदारी घेतो, असे म्हटले. परंतु, राज ठाकरेंना ते देखील दिले नाही. यानंतर राज ठाकरेंनी शिवसेना सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. परंतु, राज ठाकरेंनी शिवसेना सोडावी, अशी बाळासाहेबांची इच्छा नव्हती', असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. मग राज ठाकरे युतीत का नाहीत? या प्रश्नावर उत्तर देताना एकनाथ म्हणाले की, लोकसभेत ते आमच्या व्यासपीठावर आले होते. आता विधानसभेला ते वेगळे असले तरी आमच्या विरोधात नाहीत. अजून वेळ आहे. पुढे बघू काय होते, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.