who will be next CM Of Maharashtra : महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष (भाजप), शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीने बंपर यश मिळवलं आहे. यानंतर आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांची मालल कुणाच्या गळ्यात पडणार या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. महायुतीला २३५ जागा मिळाल्या आहेत, तर एकट्या भाजपला १३२ जागा मिळाल्या आहेत. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ५७ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर अजित पवार यांना ४० जागा मिळवल्या आहेत. त्यामुळे आता मुखमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार या बाबत उत्सुकता वाढली आहे.
महाराष्ट्राच्या या निकालानंतर मुख्यमंत्री कोण होणार या कडे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नावे चर्चेत आहेत. तर भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांकडूनही दावे केले जात आहेत. मात्र, या प्रश्नाचे उत्तर देताना दोन्ही नेत्यांनी पुढचा मुख्यमंत्री कोण असेल हे तिन्ही पक्ष मिळून ठरवतील, असे काल स्पष्ट केलं आहे.
महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर राज्याच्या पुढील मुख्यमंत्रिपदाबाबत प्रश्न निर्माण झाला होता. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अंतिम निकाल लागल्यानंतर आम्ही सर्व जण एकत्र बसून निर्णय घेऊ. आम्ही सर्व जण मिळून यावर निर्णय घेऊ.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्र्याची निवड एकत्रितपणे केली जाईल. मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर कोणताही वाद होणार नाही. निवडणुकीनंतर तिन्ही पक्षांचे नेते बसून या विषयावर निर्णय घेतील, असे पहिल्या दिवसापासून ठरविण्यात आले होते. हा निर्णय सर्वांना मान्य असेल, त्यावर मतभेद होणार नाहीत.
महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या महायुतीत शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा समावेश आहे. मात्र, मुख्यमंत्रिपदावरून युतीत काही मतभेद निर्माण झाल्याचे वृत्त आहे. विविध पक्ष या पदावर दावा करत आहेत. शिवसेनेचे आमदार आणि प्रवक्ते संजय शिरसाट यांनी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर लढवली होती. मतदारांनी मतदानाच्या माध्यमातून शिंदे यांच्या बाजूने आपली पसंती दाखवून दिली आहे. हा शिंदे यांचा अधिकार आहे असे मला वाटते. तेच पुढचे मुख्यमंत्री होतील, असा आम्हाला विश्वास आहे.
त्याचवेळी भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे केले जात आहे. महाराष्ट्रातील या नेत्रदीपक विजयानंतर भाजपच्या अनेक केंद्रीय पातळीवरील नेत्यांनी त्यांच्या घरी जाऊन विजयाचा जल्लोष केला. आता महाराष्ट्रावर कोणाची सत्ता आहे हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन करण्यासाठी आरएसएसची पसंती आहे. या बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी संबंधित सर्वांशी चर्चा करणार असून त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. जर मुख्यमंत्रिपद शक्य झाले नाही, तर देवेंद फडणवीस हे भाजपचे नवे अध्यक्ष होऊ शकतात अशी देखील शक्यता आहे.
विधानसभेच्या या निकालानंतर महायुतीच्या नव्या सरकारचा उद्या शपथविधी होण्याची शक्यता आहे. मुंबईतील वानखेडे मैदानावर हा शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे .