Devendra Fadnavis in Pune : ‘जर महाविकास आघाडी व्होट फॉर जिहाद करणार असेल तर मतांचं धर्मयुद्ध इथं लढावं लागेल. त्यामुळे आपण जर एक राहिलो तर सेफ राहू. मी तुम्हाला विनंती करतोय’ असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील सभेतून महाविकास आघाडीच्या नेत्यांनवर निशाणा साधला, आवाहन केलं आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पुण्यात जाहीर सभेत बोलताना महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. महाविकास आघाडीवर धर्माधारित ध्रुवीकरणाचा आरोप करत फडणवीस यांनी याला 'व्होट जिहाद' असं संबोधलं आणि महायुती सरकारच्या बाजूने लढण्याचं आवाहन मतदारांना केलं.
फडवणीस म्हणाले, उलेमा कौन्सिलने महाविकास आघाडीकडे १० टक्के मुस्लिम आरक्षण आणि २०१२ च्या दंगलीतील आरोपींची सुटका यासह १७ मागण्या सादर केल्या आहेत. महाविकास आघाडीने या मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्या आहेत. हे धोकादायक आहे. त्यांनी व्होट जिहादचा नारा दिला आहे. व्होट जिहादचे सिपे सालार कोण आहे, ते तुम्ही आता ऐकलं असेल. व्होट जिहादासाठी ते उलेमा यांचे तळवे चाटत असून जर या ठिकाणी व्होट जिहाद होणार असेल तर मतांचं धर्मयुद्ध करावे लागेल. त्यामुळे एक राहिलो तर सेफ राहू. या देशाला अस्थिर करण्याचा डाव विरोधकांचा आहे. यामध्ये महाविकास आघाडी सामील आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, निवडणुका येतील आणि जातील, पण काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी तुष्टीकरणाचे राजकारण सुरू केलं आहे. यातून ते समाजात फुट पाडत आहेत. आम्ही कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. जेव्हा आम्ही 'लाडकी बहीण योजना' सुरू केली तेव्हा आम्ही मुस्लिम समाजातील बहिणींना देखील त्याचा लाभ दिला. त्यांना ही योजना नाकारण्यात आली नाही. आम्ही धर्माचा भेदभाव न करता प्रत्येक बहिणीला या योजनेचा लाभ दिला. पण विरोधक समाजात तेढ निर्माण करून मतदारांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. खडकवासला येथील सभेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सज्जाद नोमानी मौलानाचा व्हिडीओ ऐकवला मतदारांना महायुतीच्या बाजूने उभं राहण्याचं आवाहन केलं.
याआधी भाजपचे खासदार रविशंकर प्रसाद यांनीही महाविकास आघाडीवर निशाणा साधला होता. मराठी मुस्लीम सेवा संघाने महाविकास आघाडीला दिलेल्या पाठिंब्याच्या कथित पत्राचा संदर्भ देत ते म्हणाले, 'मुस्लिम मतांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष छुपा अजेंडा राबवत आहेत. मात्र, काँग्रेसने हे आरोप फेटाळून लावले आहेत. अखिल भारतीय उलेमा बोर्डाचे कोणतेही पत्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पाठवण्यात आलेले नाही, असे महाराष्ट्र काँग्रेसने ६ नोव्हेंबर रोजी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
महायुती खोटी छायाचित्रे आणि बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून जनतेची दिशाभूल करत आहे. पण खोटेपणाच्या साहाय्याने सत्य दडपता येत नाही. हे महायुतीचे दिशाभूल करणारे डावपेच असून भाजप आणि त्यांचे सहकारी खोट्या बातम्या पसरवत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. मुस्लीम मतांसाठी महाविकास आघाडीवर तुष्टीकरणाचा आरोप भाजपने केला आहे, तर काँग्रेसने हे महायुतीचे षडयंत्र असल्याचे म्हटले आहे.