boy died in leopard in Alefhata Pune : पुणे जिल्ह्यातील आळेफाटा जवळील काळवाडी येथे मामाच्या गावाला यात्रेसाठी आलेल्या एका ८ वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला असून यात हा चिमुकला ठार झाला आहे. ही घटना आज सकाळी ८.३० च्या सुमारास घडली. रुद्र महेंद्र फापाळे (वय ८) असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. तसेच ग्रामस्थांनी वनविभागावर संताप व्यक्त केला आहे,
मृत मुलगा हा मुळ अकोले (जि. अहमदनगर) येथील बदगी बेलापूर येथील रहिवासी आहे. तो यात्रेनिमित्त काळवाडी येथे त्याचा मामा रोहिदास गेनभाऊ काकडे यांच्याकडे आई सोबत आला होता. रुद्रची आई काल रात्री ही गावी गेली होती. मात्र, आज सकाळी बिबट्याने रुद्रवर हल्ला केला. यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच रुद्रची आई भाग्यश्री फापाळे यांनी टाहो फोडला.
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रुद्र हा आज सकाळी ८.३० वाजण्याच्या घराजवळ खेळत होता. घराच्या बाजूला असणाऱ्या गोठ्याजवळ रुद्र गेला असता, अचानक बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. त्याला उचलून बिबट्याने त्याला शेजारी असलेल्या ऊसाच्या शेतात नेले. रुद्राच्या आवाजाने घरातील नागरिक बाहेर आले. त्यांना रुद्र दिसला नाही. तसेच बिबट्याच्या पायाचे ठसे दिसले, त्यांनी रुद्रचा शोध घेतला असता, ऊसाच्या शेतात त्याचा मृतदेह दिसला.
या घटनेची माहिती वनवीभागाला कळवण्यात आली, वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी काळवाडी व परिसरातील ग्रामस्थांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले, या ठिकाही असलेल्या बिबट्याच्या बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी करूनही येथे पिंजरा लावला नसल्याने बिबट्याचे हल्ले वाढले असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
जुन्नर तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात येथील नागरिक जखमी झाले आहे. दोन दिवसांपूर्वी पिंपळवंडी येथे एका तरुणीवर बिबट्याने हल्ला केला होता. यात ही तरुणी गंभीर जखमी झाली होती. तर दोन महिन्यांपूर्वी उंब्रज येथील साडेतीन वर्षांचा मुलगा देखील बिबट्यांच्या हल्ल्यात जखमी झाला होता.
संबंधित बातम्या