Eid-e-Milad Holiday Date Changed: महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी मुंबईत ईद-ए-मिलादची अधिकृत सुट्टी १६ सप्टेंबरऐवजी १८ सप्टेंबरला जाहीर केली. १७ सप्टेंबर रोजी येणाऱ्या गणेश उत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीदरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून स्थानिक मुस्लिम समाजाने १६ सप्टेंबरऐवजी १८ सप्टेंबर रोजी ईदची मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
स्थानिक जिल्हाधिकारी परिस्थितीनुसार इतर जिल्ह्यांमध्ये ईदच्या सुट्टीचे वेळापत्रक बदलण्याबाबत निर्णय घेऊ शकतात, असे अधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. ईद-ए-मिलादला १६ सप्टेंबरऐवजी १८ सप्टेंबरला सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
अनंत चतुर्दशी १७ सप्टेंबर रोजी येत असून दोन्ही सण धुमधडाक्यात साजरे करता यावेत, यासाठी मुस्लिम समाजाने १८ सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे. गणपती उत्सवाचा शेवटचा दिवस १७ सप्टेंबरला आहे. तर, तारखेनुसार, ईद-ए-मिलाद चंद्राच्या स्थितीच्या अधीन राहून १६ सप्टेंबरला साजरा केली जाण्याची शक्यता आहे. सलग दुसऱ्या वर्षी मुस्लिम समाजाने जातीय सलोखा राखण्यासाठी मिरवणुकीचे वेळापत्रक बदलले आहे.
‘गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही विसर्जन प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी मुस्लिम समाजाने स्वेच्छेने आपल्या धार्मिक कार्यक्रमांचे वेळापत्रक बदलले आहे. हे समाजातील ऐक्य आणि सहअस्तित्वाचे उल्लेखनीय प्रदर्शन आहे’, असे पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी सांगितले.
विशेष म्हणजे नवी मुंबईतील ईद-ए-मिलादची मिरवणूक तुर्भे येथून सुरू होऊन वाशी आणि कोपरखैरणे मार्गे घणसोली दर्ग्यावर संपते. ईद-ए-मिलाद किंवा ईद-ए-मिलाद-उन-नबी हा दिवस पैगंबर मोहम्मद - इस्लामी धर्माची स्थापना करणारे आदरणीय धार्मिक आणि सामाजिक नेते यांचा जन्म आहे. यावर्षी हा उत्सव चंद्राच्या स्थितीच्या अधीन राहून पारंपारिकपणे १६ सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार होता. या उत्सवादरम्यान जगभरातील मुस्लीम बांधव मिरवणुकीत सहभागी होतात.
महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात दरवर्षी गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो. या वर्षी ७ सप्टेंबरला गणेशोत्सवाला सुरुवात झाली. येत्या १७ सप्टेंबरला अनंत चतुर्थी असेल, या दिवशी सर्व गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाईल. याआधी १६ सप्टेंबरला मोठ्या संख्येत गणेशभक्त आपल्या जवळच्या मंडळाला किंवा आपल्या परिसरातील प्रसिद्ध गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाण्याची शक्यता आहे. यामुळे मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.