ED Action on vips group in Pune : पुण्यातून मोठी बातमी येत आहे. जादा परतव्याच्या आमिषाने गुंतवणूक दारांची तब्बल १०० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. तब्बल २४ कोटी ४१ लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली असून या कंपनीचा संचालक विनोद खुटे हा अटक होण्याच्या भीतीने दुबईत फरार झाला असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी ईडीचे सहायक संचालक रत्नेशकुमार कर्ण (वय ४३) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. ‘व्हीआयपीएस’ कंपनीने जादा परतावा देण्याच्या आमिषाने अनेकांची १०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे हे प्रकरण होते. ही फसवणूक कंपनीचे संचालक विनोद तुकाराम खुटे, मंगेश खुटे, संतोष तुकाराम खुटे (तिघे रा. निर्माण व्हिवा सोसायटी, सिंहगड महाविद्यालयाजवळ, आंबेगाव बुद्रुक), किरण पितांबर अनारसे, अजिंक्य बडघे यांच्यासह त्यांच्या आणखी काही साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
व्हीआयपीएस कंपनीचा संचालक विनोद खुटे आणि त्याच्या साथीदारांनी त्यांच्या कंपनीत गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल असे आमिष अमेकांना दाखवत तब्बल १०० कोटी रुपयांची फसवणूक अनेकांची केली होती. यानंतर त्याच्या आंबेगाव बुद्रुक परिसरातील कार्यालयाला टाळे लावून संचालक खुटे परदेशात पळून गेला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अनेक गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे धाव घेत या प्रकरणी तक्रार दिली होती. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी तपास केला असता, तब्बल १०० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले.
या प्रकरणाचा समांतर तपास ईडी देखील करत होती. त्यामुळे या प्रकरणी अहमदाबादमधील व्हीआयपीएस कंपनी आणि ग्लोबल ॲफिलेट बिझनेसवर गेल्या वर्षी मोठी छापेमरी ईडीच्या पथकाने केली होती. या प्रकरणी पीएमएलए (प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट) कायद्यान्वये गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.
यावेळी देखील विनोद खुटेच्या कुटुंबीयांच्या नावे असलेली ८ कोटी ९८ लाख रुपयांची मालमत्ता, व्हीआयपीएस आणि ग्लोबल ॲफिलेट बिझनेस कंपनीच्या नावावर असलेल्या ५ फ्लॅट्स, २ जागा, २ कार्यालये व नगर येथील २ हेक्टर जमीन देखील जप्त करण्यात आली होती. या प्रकरणी ईडीने आता पर्यंत ७० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. खूटे याने हवालाच्या माध्यमातून ही मोठी रक्कम परदेशात पाठविल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे ईडीने खुटे आणि त्यांच्या कंपनीच्या नावावर असलेली २४ कोटी ४१ लाख रुपयांची मालमत्ता शनिवारी जप्त केली. या पूर्वी देखील ७० लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या