मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  उद्धव ठाकरेंचे विश्वासू आमदार रवींद्र वायकर यांच्याशी संबंधित ७ ठिकाणांवर ईडीचे छापे

उद्धव ठाकरेंचे विश्वासू आमदार रवींद्र वायकर यांच्याशी संबंधित ७ ठिकाणांवर ईडीचे छापे

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 09, 2024 11:59 AM IST

ED Raids on Shiv Sena UBT MLA Ravindra Waikar : शिवसेनेचे आमदार व उद्धव ठाकरे यांचे विश्वासू रवींद्र वायकर यांच्यासह त्यांच्या बिझनेस पार्टनरशी संबंधित सात मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयानं (ED) छापे टाकले आहेत.

Ravindra Waikar
Ravindra Waikar

ED Raids Ravindra Waikar : शिवसेनेचे आमदार व उद्धव ठाकरे यांचे विश्वासू रवींद्र वायकर यांच्यासह त्यांच्या बिझनेस पार्टनरशी संबंधित सात मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयानं (ED) छापे टाकले आहेत. मुंबई महापालिकेच्या जमिनीचा गैरवापर करून तिथं क्लब व हॉटेल उभारल्याचा आरोप वायकर यांच्यावर आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या आमदारांच्या अपात्रता प्रकरणाचा निकाल उद्या येत असतानाच हे छापे पडल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.

ईडीचे आठ ते दहा अधिकारी आज सकाळीच वायकर यांच्या घरी व कार्यालयात पोहोचले असून त्यांनी झाडाझडती सुरू केली आहे. रवींद्र वायकर हे मुंबईतील जोगेश्वरी मतदारसंघाचे आमदार आहेत. मुंबई महापालिकेत ते अनेक वर्षे स्थायी समितीचे अध्यक्ष होते. वायकर हे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय व विश्वासू आहेत. याच प्रकरणात यापूर्वी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. आता छापे पडल्यानं वायकरांच्या अडचणी वाढल्या आहेत.

मुलानं घेतली शरद मोहोळच्या कुटुंबाची भेट; नारायण राणे म्हणाले, तो काय देशाचा मोठा नेता होता की विद्वान?

काय आहे प्रकरण?

जोगेश्वरी येथील भूखंडावर क्रीडा विषयक उपक्रम राबवण्याचा करार वायकर यांनी मुंबई महापालिकेच्या सोबत केला होता. महाविकास आघाडीचं (MVA) सरकार सत्तेवर असताना ही परवानगी देण्यात आली होती. मात्र, वायकर यांनी तिथं हॉटेल उभारलं. त्यामुळं महापालिकेचं ५०० कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा आरोप आहे. सार्वजनिक उद्यानासाठी आरक्षित असलेल्या या भूखंडाचा वापर हॉटेल बांधण्यासाठी केल्याप्रकरणी वायकर यांना नोटीस बजावण्यात आली होती.

आर्थिक गुन्हे शाखेनं याच प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. त्याच आधारावर ईडीनं वायकर यांच्यासह त्यांची पत्नी मनीषा वायकर, व्यावसायिक भागीदार आसू निहलानी, राज लालचंदानी, प्रितपाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरुण दुबे यांच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. आता छाप्यांमध्ये नेमकं काय हाती लागतं त्यावर वायकर यांचं भवितव्य ठरणार असल्याचं बोललं जात आहे.

WhatsApp channel