ED Raids Ravindra Waikar :जोगेश्वरी कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे आमदार व उद्धव ठाकरे यांचे विश्वासू रवींद्र वायकर यांच्यासह त्यांच्या बिझनेस पार्टनरशी संबंधित सात मालमत्तांवर ईडीने छापे टाकले होते. या घटनेने खळबळ उडाली होती. मुंबई महापालिकेच्या जमिनीचा गैरवापर करून तिथं क्लब व हॉटेल बांधल्याचा आरोप वायकर यांच्यावर आहे. दरम्यान, ईडीने तब्बल १५ तास त्यांची चौकशी करून त्यांना पुन्हा १७ तारखेला चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगितले आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जोगेश्वरी येथील भूखंडावर वायकर यांनी हॉटेल बांधल्याचा आरोप केला होता. याला पालिकेने परवानगी दिली नसतांना देखील याचे काम करण्यात आले होते. तब्बल ५०० कोटी रुपयांचा हा घोटाला असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. त्यानुसार सप्टेंबरच्या महिन्यात रविंद्र वायकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला गेला. दरम्यान, ईडीने देखील याची समांतर चौकशी सुरू केली होती.
आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने देखील चौकशी करत वायकर यांना चौकशीसाठी बोलावले होते. काही चौकशीला वायकर उपस्थित राहिले मात्र, त्यानंतर ते उपस्थित राहिले नव्हते. दरम्यान, ईडीने त्यांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अनेक मालमत्तांवर छापा टाकल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
रवींद्र वायकर हे मुंबईतील जोगेश्वरी मतदारसंघाचे आमदार आहेत. मुंबई महापालिकेत ते अनेक वर्षे स्थायी समितीचे अध्यक्ष राहिले आहेत. वायकर हे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय व विश्वासू आहेत. त्यामुळे त्यांची चौकशी सुरू झाल्याने वायकरांच्या अडचणी वाढल्या आहेत.